रत्नागिरी:- कोकण रेल्वेत चार कोटीच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी आणखी दोघांना सांगलीतून अटक केली आहे.
गेल्या २ मे २०२३ रोजी काणकोण रेल्वेस्थानकावर गाडी क्रॉसिंगसाठी थांबली होती. यावेळी तब्बल ४ कोटी रुपये किमतीचे ७ किलो वजनाचे सोन्याचे दागिने असलेली बॅग अज्ञातांकडून चोरी करण्यात आली. संपत जैन यांच्याकडे काम करणाऱ्या अशोक आर. यांनी या प्रकरणी कोकण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी याप्रकरणी तपास करत संशयितांना अटक करून सोने जप्त करत आहेत. सोने चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावत पोलिसांनी यापूर्वी पाच जणांना अटक केली आहे. सांगलीतून अटक करण्यात आलेल्या आणखी दोघांकडून एक कार आणि दोन मोबाइल जप्त केले आहेत. दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अतुल कांबळे (वय ३९) आणि महेंद्र ऊर्फ महेश माने (वय ३०, दोघेही रा. सांगली) अशी नव्याने अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक सुनील गुडलर, पोलीस शिपाई अमरदीप चौधरी, श्रीनिवास रेड्डी आणि समीर शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून खानापूर येथून सोने नेण्यासाठी वापरण्यात आलेली महिंद्रा लोगन चारचाकी जप्त करण्यात आली आहे.
चार दिवसांपूर्वी या प्रकरणी बेळगावातून एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून तीस लाख किंमतीचे सोने आणि चार लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.