रत्नागिरी:- कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करत सुमो गाडी आणि महिंद्रा गाडीतून नियमबाह्य पध्दतीने अधिक प्रवाशांची वाहतुक केली. याप्रकरणी दोन चालकांविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 12 जून रोजी सकाळी 10 आणि सायंकाळी 6 वा.सुमारास खंडाळा नाका ते निवळी जाणार्या रस्त्यावर तसेच जयगड गणपतीपुळे रस्त्यावरील वरवडे तिवरी बंदराजवळ करण्यात आली.
रुपेश यशवंत कदम (32, रा.वाटद पूर्व बौध्दवाडी, रत्नागिरी) आणि सकलेन सादिक बोरकर (25, रा.दखनी मोहल्ला, जयगड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सुमो आणि महिंद्रा गाडी चालकांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पोलिस काँस्टेबल विनय मनवल आणि पोलिस काँस्टेबल मधुकर सरगर यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार शनिवारी सकाळी रुपेश आपल्या ताब्यातील टाटा सुमो (एमएच- 08-झेड- 2011) मधून आणि सायंकाळी सकलेन आपल्या ताब्यातील महिंद्रा (एमएच- 08-एपी- 3314) मधून सरकारी आदेशांकडे दुर्लक्ष करत जाणिवपूर्वक नियमबाह्य पध्दतीने अधिक प्रवाशांची वाहतुक करत होते. याप्रकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.