रत्नागिरी:- तालुक्यातील जाकादेवी ते चाफे जाणाऱ्या रस्त्यावरिल ट्रक-दुचाकी अपघात प्रकरणी त्या ट्रक चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक (क्र. एमएच-४० बीएल ९९९८) वरिल चालक असा संशयित आहे. ही घटना मंगळवारी (ता. १) सकाळी साडेदहाच्या सुमारास निवळी ते जयगड रस्त्यावरील ओरी देणवाडीतील चाफे गावातील पेट्रोल पंपाचे अलिकडे वळणावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातातील मृत स्वार किरण कृष्णा पागडे (वय ४२, रा. चाफेरी, रत्नागिरी) हे दुचाकी (क्र. एमएच-०८ बीटी ३७६८) घेऊन खंडाळाहून जाकादेवी येथे येत असताना चाफे येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या पुढे असलेल्या वळणापासून काही अंतर मागे असताना त्यांची गाडी पेट्रोल पंपाच्या पुढील वळणावर आली असता जाकादेवीकडून येणाऱ्या ट्रक चालकाने ट्रक निष्काळजीपणे चालवून समोरुन येणाऱ्या दुचाकीला ठोकर देवून अपघात केला. या अपघातात स्वाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादी राजेश चंद्रकांत जाधव यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.