चाफेरीतील आदित्येश्र्वर गाव पॅनल स्थानिक ग्रामस्थांचे; इतर कुणाचाही संबंध नाही: महेश चौगुले

रत्नागिरी:- चाफेरी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी आदित्येश्र्वर गाव विकास पॅनल हे इथल्या स्थानिक ग्रामस्थांचे आहे. इतर कुणाचाही या पॅनलशी संबंध नाही. असा संबंध जोडून मोठ होण्याचा प्रयत्न हास्यास्पद असून याला स्थानिक जनता येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवेल असा दावा महेश चौगुले यांनी केला आहे.

जयगड पंचक्रोशीतील चाफेरी ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत आदित्येश्र्वर गाव विकास पॅनलच्या माध्यामातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून सात पैकी दोन सदस्य बिनविरोध निवडून देखील आणले. उर्वरित पाच सदस्य आणि थेट सरपंच पदासाठी आदित्येश्र्वर गाव पॅनलचे पारडे जड आहेत आणि आम्ही प्रचारात देखील आघाडी घेतली आहे. याचमुळे विरोधी पॅनलच्या नेत्यांची पळताभुई थोडी झाली असून विरोधकांनी आता थेट आदित्येश्र्वर पॅनलवर दावा करून मतदारांची दिशाभूल सुरू केली आहे.

मुळात पक्षाच्या विरोधात जाऊन काहीजण चाफेरी ग्रामपंचायतीसाठी काम करत आहेत. याची दखल येथील स्थानिक पक्ष नेतृत्वाने घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ज्या पक्षाचे आपण पद घेतले आहे त्या पक्षाचा विचार आणि आदेश न पाळता विरोधी गटाशी हातमिळवणी करून काम करणे कितपत योग्य असा सवाल महेश चौगुले यांनी केला आहे. चाफेरीतील जनता सुज्ञ आहे. पाच वर्षात झालेला विकास, झालेली कामे याची माहिती इथल्या ग्रामस्थांना आहे. भविष्यात आपल्यासाठी कोण योग्य हे इथली जनता जाणते यामुळेच विरोधक नाहक अपप्रचार करत असेल तरी येणाऱ्या निवडणुकीत आदित्येश्र्वर गाव विकास पॅनलच बहुमताने विजयी होईल असा निर्धार महेश चौगुले यांनी व्यक्त केला.