ग्रामपंचायतींकडून तयारी, नियमावली तयार
रत्नागिरी:– गणेशोत्सावाला कोकणात हजारो चाकरमानी दाखल होणार आहेत. मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे त्यातून संक्रमण होण्याची भिती ग्रामस्थांमध्ये आहे. गावातील लोकांमध्ये संक्रमण होऊ नये यासाठी क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसांचा रहावा अशी तयारी जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी सुरु केली आहे. त्यादृष्टीने गावातील लोकांची मानसिकता तयार करण्यावरही भर दिला जात आहे.
गणेशोत्सावात कोकणातील गावी जाणार्या चाकरमान्यांसाठी सरकारतर्फे एसटी सेवा सुरु करण्यात येणार आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील ग्रामपंचायती देखील चाकरमान्यांसाठी नियम आखण्यासाठी सरसावल्या आहेत. येणार्या चाकरमान्यांना चौदा दिवसांचा क्वारंटाईन काळ पूर्ण करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे मत झाले आहे. तसेच ठराव किंवा आवाहन विविध ग्रामपंचायतीकडून करण्यास सुरवात झाली आहे. मुंबईकर चाकरमान्यांपर्यंत निरोपही धाडले जात आहेत. रत्नागिरीतील वरवडे, नाखरे या ग्रामपंचायतींनी चाकरमान्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरु केली आहेत.
गावाकडे यायचे असेल तर चाकरमान्यांनी चौदा दिवस अगोदर यावे असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. कोरोनाचे संकट पाहून हा निर्णय घेतल्याचे येथील सरपंचांनी स्पष्ट केले. 5 ऑगस्टनंतर गावी न आल्यास कोणत्याही प्रकारचा दंड मात्र आकारला जाणार नाही. पण येणार्या चाकरमान्यांनी सर्व काळजी घ्यावी, असा पवित्रा येथील लोकांनी घेतला आहे. सरकारने क्वारंटाईन कालावधी सात दिवसांचा केल्यास ग्राम कृतीदल गावाच्या सुरक्षिततेसाठी अंमलबजावणी करताना गावातील लोकांची मानसिकता बनविली जात आहे. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये अशाच प्रकारचं चित्र दिसून येत आहे. सिंधुदुर्गमध्ये सरपंच संघटनेकडून तसे निवेदन देण्यात आले आहे.