रत्नागिरी:- अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे महामंडळाने खास चाकरमान्यांच्या सोयीकरता सुमारे 272 जादा गाड्या सोडल्या आहेत. याशिवाय 32 गाड्या नियमित आहेत. जादा गाड्यांमध्ये आणखी वाढ करण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे. बहुतांशी जादा गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
कोकणातील गणेशोत्सावासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी मुंबई तसेच ठाणे या भागातून गावात दाखल होत असतात. पूर्वी चाकरमान्यांचा प्रवास एसटी गाड्यांवरच अवलंबून होता. मात्र कोकण रेल्वेनंतर चाकरमान्यांचा ओढा कोकण रेल्वेकडे वळला.
दरवर्षी कोकण रेल्वे एसटी महामंडळाप्रमाणेच चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम महामार्गावरून जादा गाड्या सोडते. यावर्षीही मोठ्या संख्येने कोकण रेल्वे मार्गावर ज्यादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित गाड्यांबरोबरच हॉलीडे स्पेशल तसेच अन्य गाड्यांचा समावेश आहे. या बहुतांशी गाड्यांचे आरक्षण आता पूर्ण होत आले आहे. शिवाय कोकण रेल्वेने एसटी महामंडळाशी समन्वय साधत चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी,कणकवली, कुडाळ,सावंतवाडी या महत्वाच्या स्थानकांवर उतरणार्या चाकरमान्यांना त्यांच्या गावापर्यंत थेट जाण्यासाठी एसटी बसेस सोडण्याच्या सूचना केल्या आहेत. 27 ऑगस्ट पासून खर्याअर्थाने चाकरमानी गावाला येण्यास सुरूवात होणार आहे. चाकरमान्यांच्या स्वागतासाठी स्थानिक प्रशासन पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.