रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या चारमान्यांचा गौरी-गणपती विसर्जनानंतर परतीचा प्रवास सुरु झाला आहे. सोमवारी (ता. ५) रात्रीपासून कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांवर मुंबईकडे जाणार्या गाड्यांना प्रचंड गर्दी झाली आहे. मडगाव, सिंधुदुर्गहून गाड्या भरुन येत असल्याने डब्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी चढाओढ पहायला मिळाली. आरक्षित डब्यांमध्येही मिळेल तिथे, अगदी शौचालयाच्या दरवाज्यातही बसूनही अनेकजणं प्रवास करत होते. प्रत्येक स्थानकावर प्रवाशांमध्येच तु तु मै मै होत होती. रेल्वे पोलिसही प्रवाशांच्या मदतीसाठी धावत होते.
यंदा दीड ते दाेन लाख चाकरमानी गणेशोत्सवासाठी दाखल झाले आहेत. सोमवारी सायंकाळी गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर मुंबईकर चाकरमानी गावाहून परतीच्या प्रवासाला निघाले. रात्री ९ वाजल्यानंतर राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड या स्थानकांवर प्रचंड गर्दी होती. याठिकाणी लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा आहे. तुतारी, पॅसेंजर, गणपती विशेष गाड्या सर्वच ठिकाणी थांबत असल्याने त्यांच्या वेळेत छोट्या-मोठ्या स्थानकांवर प्रवाशांनी ठाण मांडलेला होता. काल रात्री कोकणकन्या, तुतारी, मत्स्यगंधा यासह गणपती विशेष गाड्यांसाठी चाकरमान्यांनी स्थानकावर ठाण मांडलेेले होते. यामध्ये कोकणकन्या आणि तुतारीला चाकरमान्यांची पहिली पसंती होती. या गाड्या आधीच भरुन आल्यामुळे डब्यांमध्ये बसायला सोडाच दोन पाय ठेवून उभे रहायलाही जागा नव्हती. काही प्रवासी दरवाज्याच्या पायर्यावर बसून होते. डब्यात शिरण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागत होती. काही प्रवाशांनी शौचालयाचा दरवाज्याबाहेर बसून प्रवास करणे पसंत केले. सकाळी वेळेत मुंबईत पोचण्याची प्रत्येकालाच गडबड असल्यामुळे एक्स्प्रेस गाडीतून प्रवासावर भर होता. सर्वसाधारण डब्यांमध्ये तर जागाच नव्हती. साहिन्य ठेवण्याच्या जागांवरही प्रवासी जागा करुन बसले होेते. महिलांच्या डब्यांमध्येही प्रचंड गर्दी होती. रत्नागिरी स्थानकात तर काही डबे प्रवाशांनी आतून बंद करुन ठेवले होते. ते रेल्वे पोलिसांच्या मदतीने उघडायला लावण्यात आले. तिकिट आरक्षित असूनही प्रवाशांना जागा मिळत नव्हती. अशावेळी रेल्वे पोलिसांची मदत होत होती. किरकोळ बाचाबाची वगळता दिड दिवसात वादाचा मोठा प्रसंग उद्भवलेला नव्हता. रत्नागिरी स्थानकात तर प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांमध्ये गाड्यांचे डबे वाढवा अशी चर्चा सुरु होती. रेल्वे पोलिसांकडून गणपती फेस्टीव्हल गाड्यांतून प्रवास करा असा सल्ला प्रवाशांना दिला जात होता. या गाड्यांमध्ये बसायला जागा उपलब्ध असते अशाही सुचना दिल्या. कोकण रेल्वे मार्गावर सव्वाशे रेल्वे पोलिस कार्यरत होते. प्रत्येक रेल्वेतही तिन जणांची नियुक्ती केली होती.