चांदोर येथे वृद्धाला मारहाण प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:-तालुक्यातील चांदोर उगवतवाडी येथे अज्ञात कारणातून वृध्दाला काठीने मारहाण करत त्याचा पाय फ्रॅक्चर केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना सोमवार 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वा.सुमारास घडली.

चंद्रकांत तुळाजी रेवाळे,रितेश चंद्रकांत रेवाळे आणि तुळाजी नारायण रेवाळे (सर्व रा.चांदोर उगवतवाडी,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात बाब्या नारायण रेवाळे (75,रा. चांदोर उगवतवाडी, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी आणि संशयित हे नात्याने चुलते ,पुतणे,नातू आणि भाऊ आहेत. सोमवारी सायंकाळी बाब्या रेवाळे हे आपल्या भावाच्या घराच्या मागील बाजूस बसले होते. त्यावेळी संशयितांनी त्याठिकाणी येऊन संगनमताने त्यांना काठीने मारहाण केली.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल चव्हाण करत आहेत.