चांदा ते बांदा योजनेच्या धर्तीवर सिंधूरत्न योजनेची अंमलबजावणी: अ‍ॅड. परब

रत्नागिरी:- चांदा ते बांदा योजना दिपक केसरकर यांनी सिंधूदुर्ग जिल्ह्यात उत्कृष्टपणे राबविली. त्याच धर्तीवर सिंधूरत्न योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. ही योजना तळागळापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. त्यासाठी निधी कमी पडू दिली जाणार नाही. या कार्यशाळेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांपर्यंत योजनेची माहिती पोचवा, असे प्रतिपादन पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब केले.

सिंधुरत्न समृध्द योजना अंमलबजावणी प्रशिक्षण कार्यशाळा अल्पबचत सभागृहात झाली. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, खासदार विनायक राऊत आणि आमदार योगेश कदम तर आमदार दिपक केसरकर, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, प्रजित नायर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता संजय सावंत आदी उपस्थित होते.

याप्रसंगी खासदार राऊत म्हणाले, सिंधुदूर्ग जिल्हयाबरोबर आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी सदर योजना राबविली जाणार असल्याने रत्नागिरी साठी सुवर्णसंधी मिळाली आहे. ही योजना चांदा ते बांदा या योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येत असून  रोजगार, आर्थिक उन्नती, वैयक्तीक उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. या योजनेतून बांबू लागवड, मत्स्य व्यवसाय, कृषि, बचत गट, कोळंबी उत्पादन केंद्र, रोजगार क्षेत्र, पर्यटन, काजू प्रक्रिया, आंबा प्रक्रिया आदि उद्योगांना अधिक चालना मिळणार आहे.
यावेळी दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी या योजनेच्या आराखडयाचे सादरीकरण केले.                या योजनेचे अध्यक्ष आमदार दिपक केसरकर यांनी सादरकरणावेळी संबधित विभागांच्या अधिकार्‍यांशी विविध विषयावंर चर्चा केली.