चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

शेतकर्‍यांसह मच्छीमारांना भरीव मदतीचे आश्‍वासन

रत्नागिरी:- तौक्ते चक्रीवादळामुळे किनारी भागात झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून शनिवारी (ता. 5)पाहणी करण्यात आली. बाधित आंबा बागायतदारांसह मिरकरवाडा बंदरात नुकसान झालेल्या मच्छीमारांशी संवाद साधत समितीने भरीव मदत देण्याचे आश्‍वासन शेतकर्‍यांसह मच्छीमारांना दिले.

शनिवारी सकाळी ही समिती रत्नागिरीत दाखल झाली. यामध्ये पथकाचे प्रमुख आयएएस अधिकारी अशोककुमार परमार, केंद्रीय अर्थ विभागाचे संचालक अभय कुमार, केंद्रीय वीज बोर्डाचे अधिक्षक अभियंता जे. के. राठोड, केंद्रीय कृषी विभागाचे संचालक आर. पी. सिंग, कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर, मत्स्य विभागाचे संशोधक अशोक कदम यामध्ये सहभागी झालेले होते.चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय पथकाने बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी वादळापुर्वी प्रशासनाकडून घेतलेली काळजी आणि त्यानंतर मदतीसाठी केलेले प्रयत्न याची माहिती दिली. तसेच आपत्कालीन परिस्थिती भविष्यात राबविले जात असलेल्या प्रकल्पांचे प्रेझेंटेशन सादर केले. त्यात भूमिगत विज वाहिनी प्रकल्प, शेल्टर प्रकल्प यांचा समावेश होता. दिलेल्या माहितीवर पथकातील अधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले.बैठकीनंतर पथकाने वादळातील बाधित बागायतदारांशी संवाद साधला.

रत्नागिरीतील कोळंबे येथील विश्‍वास सुर्यकांत दामले यांच्या बागेची पाहणी केली. त्याच्या बागेतील 25 झाडं तुटली असून 140 झाडांची फळगळ झालेली होती. झालेल्या नुकसानीविषयी पथकातील तज्ज्ञ अधिकार्‍यांन वादळाची तिव्रता आणि झालेल्या नुकसानीसंदर्भात प्रश्‍न विचारले.  दामले यांनी सविस्तर माहिती पथकाला दिली. याप्रसंगी बागायतदार दामले यांनी वादळामध्ये फळगळीने अधिक नुकसान झाले आहे. सध्या हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर झाली आहे. तुलनेत अधिक नुकसान आहे. त्यानुसार अपेक्षित केंद्राकडून मिळावी अशी मागणी केली. वादळातील नुकसानीचे फोटो आणि व्हीडीओ पथकाने बागायतदारांकडून घेतले. तुटलेली झाडे बागेत तशीच असल्यामुळे वादळावेळच्या परिस्थितीची कल्पना पथकला आली. त्यानंतर या पथकाने मिरकरवाडा येथील मच्छीमारांशी संवाद साधला. बोटीचे नुकसान कशाप्रकारे झाले याबाबत माहिती जाणून घेतली. दोन्ही घटकांशी संवाद साधल्यानंतर पथकाकडून केंद्र शासनाकडून भरीव मदत दिली जाईल असे आश्‍वासन देण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मे महिन्याच्या मध्यात धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीसह मुंबईला मोठा तडाखा बसला होता. वादळातील नुकसान झालेल्यांना राज्य शासनाकडून निसर्ग वादळातील निकषाप्रमाणे वाढीव भरपाई जाहीर करण्यात आली. राज्य शासनाची भरपाई मंजूर झाल्यानंतर केंद्रीय पथकाकडून मुंबईसह बाधित झालेल्या जिल्ह्याची पाहणी सुरु केली आहे. 2 जूनला या समितीने दौर्‍याला सुरवात केली.