रत्नागिरी:- रत्नागिरीतील चंपक मैदान परिसरात दुर्मिळ ‘इजिप्शिअन गिधाड’ (पांढरे गिधाड) आढळून आले आहे. रत्नागिरी तालुक्यातील हौशी पक्षी निरीक्षकांना 19 डिसेंबरला केलेल्या निरीक्षणाप्रसंगी ते आढळून आले. निसर्ग चक्रीवादळानंतर ते भटकंती करत रत्नागिरीत आले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे.
गिधाडांमधील अशाच एका दुर्मीळ प्रजातीची नोंद रत्नागिरीत झाली आहे. 19 डिसेंबरला रत्नागिरी शहराजवळील चंपक मैदानात हौशी पक्षी निरीक्षकांना ‘इजिप्शिअन गिधाड’ दिसले. पक्षीनिरीक्षक आशिष शिवलकर, डॉ. प्रणव परांजपे आणि अॅड. प्रसाद गोखले यांनी या गिधाडाचे छायाचित्र टिपले होते. या प्रजातीमधील इजिप्शिअन गिधाड हे आकाराने लहान असते. त्यांचा आकार मोठा नसतो. भटकंती करत ती इकडे येतात. हाडाच्या आतमधील भाग हे गिधाड सर्वाधिक प्रमाणात खाते. याचे मुळ साऊथ आफ्रीकेत असून थंडीच्या हंगामात ते राजस्थान, दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्थलांतर करते. कोकणात ते दुर्मिळच आहे. या गिधाडाचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे पक्षी मित्रांचे मत आहे.
महाराष्ट्रातून गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद असली, तरी पांढर्या पुठ्ठ्याची’, लांब चोचीची’ आणि पांढरी गिधाडे’ 1990 आणि त्यापूर्वी मोठ्या संख्येने आढळत होती. अपुर्या खाद्य पुरवठ्यामुळे गिधाडांची संख्या कमी होत आहे. त्यांचा समावेश नष्ट प्राय श्रेणीतील पक्ष्यांच्या यादीत केला आहे. कोकणात गिधाडांचा अधिवास असून रायगड जिल्ह्यातील म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यात गिधाडे आढळतात. तेथे हिमालयीन ग्रिफन गिधाडांचीही नोंद आहे. काही महिन्यांपूर्वी रायगड-रत्नागिरीला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका गिधाडांच्या अधिवासाला बसला होता. गिधाडांची घरटी असणारी झाडे उन्मळून पडली. आता परिस्थिती पूर्ववत होऊ लागल्यावर ती आपापल्या निवास्थानी परतू लागली आहेत.