रत्नागिरी:- राज्य सरकारने १ सप्टेंबरपासून घरांच्या परवानग्या पूर्णपणे ऑनलाईन स्वरुपात केल्या आहेत. आतापर्यंत रत्नागिरीत २० परवानगी प्रकरणे दाखल झाली असून ती निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे घरांसाठी परवानगीला महसुल खाते आणि नगररचना विभागाकडील फेऱ्या कमी होणार आहेत.
रत्नागिरी येथील नगररचना विभागाच्या अधिकृत सुत्रांनी सांगितले की, घराची परवानगी आता केवळ ऑनलाईन स्वरुपात मागावी लागेल. ऑफलाईन स्वरुपात म्हणेज प्रत्यक्ष दस्तऐवज हजर करुन परवानगीचे कामे होणार नाहीत. तसे दस्तऐवज आता स्विकारले जात नाहीत. लोकांनी पूर्वीप्रमाणेच महसुल खात्यातील सक्षम प्राधिकाऱ्याकडे घर परवानगी मागितली पाहिजे. पण ती ऑनलाईन स्वरुपात असावी. रत्नागिरी जिल्ह्यात महसुल खात्याकडे सादर झालेले घर परवानगीचे अर्ज अभिप्रायांसाठी नगर रचना विभागाकडे वर्ग करम्यात आले आहेत. अशा अर्जांची संख्या आतापर्यत २० वर जाऊन पोहोचली आहे. महसुल खात्यातील आणि नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांना ऑनलाईन प्रखरणे हाताळणे ही बाब नवीन आहे. त्यामुळे त्याच्याकडील निर्णय आस्ते कदम होत आहे. दर बुधवारी सकाळी १० ते १ या वेळेत नगररचना विभागाचे नागरिकांच्या ऑनलाईन प्रक्रियेवरील समस्या सोडवण्यासाठी आभासी मार्गदर्शन केंद्र चालवले आहे. या केंद्रावर मार्गदर्शन घेण्यासाठी खूप गर्दी असते. प्रत्येक प्रकरणासंदर्भात मार्गदर्शन देऊ केले गेले तरीही ठरवून दिलेल्या वेळेत सर्व इच्छूक नागरिकांच्या अडीअडची सोडवल्या जाऊ शकत नाहीत. घर परवानगी प्रकरणे ६० दिवसात निकाली व्हावीत अशी मर्यादा आहे. त्या मर्यादेत निर्णय करावाच लागेल असे ही प्रशासनाकडून सांगण्यात आले.