रत्नागिरी:- सप्टेंबर महिन्यात घरफोडीसह मोबाईल, टायर दुकान आणि फोटो स्टुडिओत चोरी करणार्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने खंडाळा येथे अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल हॅण्डसेट, टायर, कॅमेरा आणि रोख रकमेसह 1 लाख 90 हजार 880 रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. तसेच चोर्या करण्यासाठी वापरलेला ट्रकही पोलिसांनी जप्त केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर असलेले निर्बध शिथील केल्यानंतर चोरी व घरफोडीचे गुन्हे वाढत आहेत. हे लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी आणि अंमलदारांची बैठक घेवुन गुन्ह्यांचा आढावा घेतला. त्यानुसार पोलिसांची पथके सतर्क झाली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खंडाळा (ता. रत्नागिरी) येथे दोन संशयित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यात अमित रविंद्र भोसले (वय 22 वर्षे, रा. रिंगी फाटा, खंडाळा) आणि प्रशांत प्रकाश विर (वय 19 वर्षे, रा. कळझोंडी, वीर वाडी) याचा समावेश आहे. त्यांनी दोन घर फोडी केल्याचे कबुल केले आहेत. रत्नागिरी शहरात 23 व 24 सप्टेंबरला नाचणे येथे शंखेश्वर प्लाझामधील मोबाईल वर्ल्डचे दुकानाचे शटर उचकटुन 12 मोबाईल हॅन्डसेट आणि रोख रक्कम चोरीस गेली होती. त्या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालमत्तेपैकी 12 मोबाईल हॅन्डसेट, एक ब्लु टुथ इयर फोन आणि 15 हजार 700 रुपये असा एकुण 1 लाख 75 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्या दोन संशयितांनी रत्नागिरी शहरात 6 व 7 सप्टेंबरला दुर्गा टायर दुकान आणि दर्पण फोटो
स्टुडिओत चोरी केल्याचे तपासात पुढे आले आहे. यामध्ये टायर आणि कॅमेरा चोरीला होता. त्या दोघांकडून सहा टायर आणि कॅमेरा असा 15 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्या दोन्ही संशयितांनी चोर्या करताना वापरलेला ट्रक (4 लाख किमतीचा) जप्त केला आहे. त्या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज भोसले करत आहेत. या चोर्यांचा छडा लावण्यात चाफेचे पोलीस पाटील हिराजी तांबे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार शांताराम झोरे, प्रशांत बोरकर, नितीन डोमणे, अरुण चाळके, रमीज शेख, अतुल कांबळे यांचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी अभिनंदन केले.