ग्राम संवाद सरपंच संघाच्या रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी निरंजन सुर्वे यांची निवड 

रत्नागिरी:-विविध शासकीय योजनांची माहिती सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी ग्राम संवाद सरपंच संघाची स्थापना करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचे अध्यक्ष निवडण्यात आले असून त्याचे कामकाज लवकरच सुरु करण्यात येणार आहे. रत्नागिरी तालुक्याच्या अध्यक्षपदी खेडशी ग्रामपंचायतीचे सरपंच निरंजन उर्फ बाळा सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे. 

ग्राम संवाद सरपंच संघाची स्थापना 1 मे रोजी झाली. प्रत्येक गावात ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य कार्यरत आहेत. त्यांचा ग्रामविकासात मोलाचा वाटा असतो. परंतु काही ठिकाणी प्रशासकीय ज्ञान कमी असल्यामुळे त्यांचा सहभाग आपसूकच कमी राहतो. त्याचा विकासावर परिणाम होतो. नियम, योजनांसह त्यांच्या अंमलबजावणीची पूर्ण माहिती त्यांना नसते. अनेकवेळा त्यापर्यंत ते पोहचतच नाहीत. ग्रामपंचायत इमारत, शाळेची इमारत, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन, स्मशानभूमी, व्यामशाळा, सभागृह, गाव व वस्ती वाड्यावर जाणारे रस्ते या भौतिक सुविधांचा अनेक गावात अभाव आहे. त्यासाठी वित्त आयोगातून तरतूद केलेली असते. त्याची माहितीच नसते. खासदार, आमदार यांच्याकडे निधी व्यतिरिक्त काय मागणी करायची याविषयी माहिती नसते. जन सुविधा 25/15 समाजकल्याण विभागातील योजना, महिला बालकल्याण योजना, घरकुल योजना अशा ब-याच योजनांची सविस्तर माहीतीचा अभाव असतो. ही माहिती संघटनेच्या माध्यमातून सरपंच, उपसरपंच व सदस्यांपर्यंत पोचवायची हा उद्देश ठेवण्यात आला आहे. ग्राम संवाद सरपंच संघ ही संघटना महाराष्ट्रातील प्रत्येक गाव आदर्श गाव करण्याचा प्रयत्न करत आहे. ग्राम संघाचे काम प्रत्येक तालुक्यात सुरु आहे. कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी नऊ तालुक्यांचे अध्यक्ष निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यात आनंद दिवाकर भाटे (मंडणगड), संदीप शांताराम धनावडे (गुहागर), निरंजन सुर्वे (रत्नागिरी), मुकेश दिपक खेतले (चिपळूण), सुधीर आत्माराम तेंडोलकर (लांजा), राजेश विजय जाधव (संगमेश्‍वर), राजेश कृष्णा आंब्रे (खेड), निलेश अशोक शेठ (दापोली), प्रकाश गंगाराम दसवंत (राजापूर) यांचा समावेश आहे. हे तालुकाध्यक्ष संघटनेचे कार्यक्रम प्रत्येक तालुक्यातील सरपंचांपर्यंत पोचवणार आहेत.