ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उत्स्फूर्त मतदान; तालुक्यात मोठ्या चुरशीची शक्यता

रत्नागिरी:- तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ७५ प्रभागातील २६४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. रविवारी (ता. १८) दिवसभरात शांततेत मतदान झाले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत तालुक्यातील २२ हजार ७२१  जणांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळपर्यंत सुमारे ६५ टक्केपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर चार ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात यश आले. उर्वरित २५ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच आणि सदस्यपदासाठी आज ७८ मतदान केंद्रांवर मतदान झाले. निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार शशिकांत जाधव यांच्या देखरेखीखाली दिवसभर प्रक्रिया सुरु होती. सकाळच्या सत्रात सत्कोंडी प्रभाग २ मध्ये मॉक पोलवेळी एक मतदान यंत्रात बिघाड झाला होता. केंद्रावरील अधिकार्‍यांनी ते मतदान यंत्र तात्काळ बदलले. त्याचा मतदान प्रक्रियेवर परिणाम झालेला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  रविवारी शासकीय सुट्टी असली तरीही सकाळच्या सत्रात बहुसंख्ये मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
गणेशगुळे येथे विवाह सोहळा पार पडण्यापुर्वी नवरी मुलीने मतदानाचा हक्क बजावला. तर एका मतदाराने आजारी असतानाही स्ट्रेचरवरुन जात मतदान केले.
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक राजकीय प्रतिष्ठेची ठरली. शिवसेनेतील शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आले होते. भाजपही काही ठिकाणी स्वबळावर निवडणुक लढवत असून काही ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना या शिंदें गटाच्या पक्षाबरोबर युती केली आहे. दिवसभरात सर्वच पक्षाचे प्रतिनिधी आपापल्या ग्रामपंचातीत ठाण मांडून होते. तालुक्यातील प्रतिष्ठेची म्हणून ओळखली जाणारी मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये सर्वच पक्षीयांनी ताकद पणाला लावली होती. त्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनीही जास्त लक्ष केंद्रीत केले होते. टिके, टेंभ्ये ग्रामपंचायतीत ६५ टक्के तर मालगुंड, निवेंडी, धामणसे, वेतोशी, भगवतीनगर ग्रामपंचायतीत ७० टक्के, साठरेबांबरमध्ये ८० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.