ग्रामदैवत भैरीबुवाला पोलिसांकडून शस्त्र सलामी

रत्नागिरी:- ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाला रत्नागिरीतील झाडगाव सहाणेवर रत्नागिरी पोलिसांतर्फे चार शस्त्रधारी पोलिसांनी सशस्त्र सलामी दिली. ही ऐतिहासिक परंपरा अनुभवण्यासाठी शेकडो रत्नागिरीकरांनी मोठ्या उत्साहाने हजेरी लावली होती.

ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या या प्रथेला १२५ वर्षांचा इतिहास आहे. या प्रसंगी ट्रस्टी, मानकरी, गुरव मंडळी आणि बारा वाड्यांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री देव भैरी जोगेश्‍वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्‍वर ट्रस्टच्या शिमगोत्सवाचा समारोप आज रंग खेळून झाला.

दुपारी भैरीबावाच्या पालखी आणि होळीच्या शेंड्यावर गुरव मंडळींनी धुपारती केली. त्यानंतर गार्‍हाणे घालण्यात आले. यानंतर पोलिसांनी सशस्त्र सलामी दिली. काजरघाटीपासून बालेकिल्ल्यापर्यंतच्या हद्दीपर्यंत श्री देव भैरीची अधिसत्ता आहे. भैरीबाबा जागृत देव असल्याने त्याची प्रचिती ब्रिटीशपूर्व काळातील तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी घेतली आहे. त्यांनी भैरीबुवाच्या मिरवणुकीला अटकाव केला होता. त्याच्या या कृत्यामुळे त्याला वाईट प्रचिती मिळाली. म्हणून तो श्री देव भैरीबाबाला नतमस्तक झाला आणि त्याने सरकार दरबारी भैरीचा मान राखला. तेव्हापासून भैरीबुवाची पालखी देवस्थानच्या मार्गावरील शहर पोलिस ठाण्यात जाण्याची प्रथा सुरू झाली. ती प्रथा आजतागायत सुरू आहे.

येथील ग्रामदैवत श्री देव भैरी, जोगेश्‍वरी, नवलाई, पावणाई आणि तृणबिंदूकेश्‍वर हे मंदिर सार्वजनिक न्यास कायद्यान्वये नोंदणी झाले आहे. देवस्थानचा कारभार रत्नागिरीतील बारा वाड्यांतील नागरिकांच्या ताब्यात आहे. १९७६ पासून तो ट्रस्टच्या अखत्यारीत आहे. २००१ मध्ये मंडळाने रौप्यमहोत्सवी शिमगोत्सव साजरा केला. देवस्थानचा कारभार बारा वाड्यांकडे आल्यानंतर या देवस्थानच्या अध्यक्षपदाची धुरा देवस्थान विश्‍वस्त संस्थेचे अध्यक्ष (कै.) अ‍ॅड. अरुअप्पा जोशी व सर्व ट्रस्टी मंडळी सांभाळत होते. गेली काही वर्षे रवींद्र तथा मुन्नाशेठ सुर्वे अध्यक्षपद आणि सर्व ट्रस्टी मंडळी देवस्थानमध्ये शांततेत शिमगोत्सव साजरा होण्यासाठी नियोजन करत आहेत.

श्री देव भैरीची पोलिसांकडून पूजा
इंग्रजांच्या राजवटीमध्ये १९१० च्या सुमारास श्री देव भैरी-जुगाईची होळी आणताना ढोल-ताशांचा गजर सुरू होता. तत्कालीन ब्रिटीश पोलिस अधीक्षकाने स्वतः येऊन सर्व वाद्ये बंद केली. त्यानंतर पंधरा मिनीटांतच ब्रिटीश अधिकार्‍याचा घोडा जागच्या जागी दोन पायांवर उभा राहिला व अधिकारी घोड्यावरून पडला. त्यावेळी भैरीबाबा जागृत आहे, हे त्यांना कळल्यावर अधिकाऱ्याने भैरीबाबाची माफी मागितली. त्यानंतर दरवर्षी भैरीची पालखी शहर पोलिस ठाण्यात जाऊ लागली. रंगपंचमीला श्री देव भैरीची पालखी शहर पोलिस ठाण्यात नेल्यानंतर पोलिसांनी श्रीफळ दिले