गोवा-करमळी येथील बोगद्यात दरड कोसळली; कोकण रेल्वे ठप्प

रत्नागिरी :  मुसळधार पावसाचा फटका आता कोकण रेल्वेला बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. गोवा-करमळी येथील बोगद्यात दरड कोसळली असून सकाळपासून कर्नाटक-केरळमध्ये जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

दरड कोसळल्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाश्यांचेही हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे गाड्यांचं वेळापत्रक खोळंबलं आहे. काही गाड्या या वेगळ्या मार्गांवरून वळवण्यात आल्या आहेत. रुळांवरील पाणी आणि दरड बाजूला करण्याचं काम सुरू असून रेल्वे केव्हा पूर्वपदावर येणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.

रत्नागिरीमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक नद्यांना पूर आला असून नजिकच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी अर्जुना नदीमध्ये रायपाटण गांगणवाडी येथून विजय शंकर पाटणे वय.70 रा. खेड हे वाहून गेले आहेत. नदी पात्रामध्ये शोध मोहिम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.