गोळप येथे अ‍ॅक्सेस- अल्टोचा अपघात; दोघेजण जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप पूल येथील नामदेव स्टॉप येथे दुचाकीने चारचाकी वाहनाला धडक दिल्याने दोघेजण जखमी झाल्याची 3 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फकीर मोहम्मद लतिफ पांढरे (69, गोळप, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फकीर पांढरे हे आपल्या ताब्यातील अ‍ॅक्सेस गाडी घेउन रत्नागिरी ते गोळप असे जात होते. यावेळी गोळप येथील नामदेव स्टॉपवर आले असता पावस ते रत्नागिरी अशा जाणार्‍या चारचाकी अल्टो गाडीला दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील चालक फकीर मोहमद लतिफ पांढरे, सत्तारमिया मोहम्मद पावसकर (60, गोळप, रत्नागिरी) हे दोघे जखमी झाले. पावसकर यांच्या पायाला, डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना म्हस्कर हॉस्पिटल रत्नागिरी दाखल करण्यात आले आहे. 

अपघातात स्वतःच्या व दुसर्‍याच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी फकीर पांढरे यांच्यावर भादविकलम 279, 337, 338 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.