गोळपला १ मेगावॅटचा पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प

कृषी विभागाकडून सात कोटीचा प्रस्ताव; जिल्हा परिषदेकडून प्राथमिक सर्व्हेक्षण

रत्नागिरी:- अपारंपरिक ऊर्जा संसाधनांसाठी जिल्हा नियोजनमध्ये राखीव असलेल्या पाच टक्के निधीमधून गोळप (ता. रत्नागिरी) येथे १ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सौरऊर्जा प्रकल्पांसाठी राज्यातील पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाकडून नियोजनकडे सात कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे. ग्रामपंचायत कार्यालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी या विजेचा वापर केला जाणार आहे.

जिल्हा नियोजनांतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षात अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रम जिल्हा परिषद कृषी विभाग राबवत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील सर्व पथदीपांची (स्ट्रीट लाईट) वीजबिले मोठ्या प्रमाणावर येतात. ती देण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. परिणामी, महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जातो. हीच स्थिती प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही दिसते. त्यामुळे स्थानिक जनतेची वारंवार गैरसोय होते. पथदीप आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची विजबिले भरण्यासाठी सादिल निधीही तुटपुंजा पडतो. जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील सर्व पथदीपांसाठी ११ लाख ८० हजार युनिट्सचा तर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १ लाख ५० हजार ७७३ युनिट्सचा वापर होतो. दोन्ही मिळून १३ लाख ५० हजार युनिट्सचा वार्षिक वापर होतो. भविष्यातील वाढती गरज लक्षात घेता दोन्हींसाठी १५ लाख ५० हजार युनिट्सची गरज भासणार आहे. हे लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात १ मेगावॅटचा सोलर प्रकल्प उभारल्यास १६ ते १७ लाख एवढे युनिट्सची निर्मिती होऊ शकते. त्यामधून पथदीपांचे आणि प्राथमिक आरोग्यकेंद्रांचे वीजबिल नगण्य तथा शुन्यावर येईल.

१ मेगावॅट क्षमतेच्या सौरप्रकल्पाचा डीपीआर तयार केला असून, अंदाजे रक्कम रुपये ७ कोटी खर्च येणार आहे. गोळप ग्रामपंचायतीमधील ५ गुंठे जागेत प्रस्तावित आहे. याबाबतचा संयुक्त सर्वे महावितरण, गोळप व जिल्हा परिषदेकडून नोव्हेंबरमध्ये झाला आहे. याला पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून हिरवा कंदील मिळाला असून, निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांच्याकडून प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे रवाना झाला आहे.