गुन्हे दाखल करा नाहीतर आणखी काहीही… आम्ही दुकाने बंद करणार नाही

लॉकडाऊनला व्यापारी संघाचा तीव्र विरोध

रत्नागिरी: शासनाने जाहीर केलेल्या मिनी लॉकडाऊनची अंमलबजावणी उद्या सुरू होते. या नियमावलीनुसार अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने सोडून इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत, मात्र शासनाच्या या नियमाला आधीच मेटाकुटीला आलेल्या व्यापारी वर्गाने जोरदार विरोध केला आहे. आमच्यावर गुन्हे दाखल करा, मात्र आम्ही दुकाने सुरू ठेवणार, अशी ठाम भूमिका रत्नागिरी शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष उदय पेठे यांनी मांडली.

मिनी लॉकडाऊनबाबत अनेक व्यापाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. याआधीच्या लॉकडाउनमुळे या छोट्या व्यापाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. कामगारांचे पगार, वीज बिले यामुळे छोटा व्यापारी संकटात आहे. आता जर सरकारने असा नियम लागू केला, तर बॅंकांचे हप्ते, नोकरांचे पगार कुणी द्यायचे, हा प्रश्न उभा राहिला आहे. एकवेळ कोरोना होऊन जीव नाही गेला तर भिकेकंगाल होऊन आत्महत्या करावी लागेल, असे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. नेमक्‍या आदेशाबाबत व्यापारी वर्गाने दोन वेळा प्रांताधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी प्रसार माध्यमाशी आपली भूमिका मांडली.

संतप्त व्यापारी वर्गाने मागील वर्षी केलेल्या लॉकडाउनची अनेक उदाहरणे दिली. मागील वर्षी ज्यावेळी लॉकडाऊन सुरु करण्यात आला, त्यावेळी रत्नागिरीत फक्त ३ रुग्ण होते. मग लॉकडाऊन केल्यावर रुग्णसंख्या वाढली कशी, ज्यावेळी लॉकडाऊन उठवण्यात आला, त्यावेळी दिवसाला सरासरी १०० रुग्ण सापडत होते. मग लॉकडाऊन उठवण्यात का आला, याचाच अर्थ असा की, रुग्णसंख्या रोखण्यासाठी लॉकडाऊनचा काहीही उपयोग झाला नाही उलट व्यापारी भिकेकंगाल झाले, त्यांचे अर्थचक्र कोलमडले. 

नव्या नियमावलीनुसार फक्त अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने सुरु राहणार आहेत. मग या दुकानातून कोरोनाचा प्रसार होत नाही काय,  कोरोना काय दुकानाच्या पाट्या बघून आत शिरतो काय, असा सवाल व्यापारी विचारतात. त्यापेक्षा मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर याची कडक अंमलबजावणी करावी, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.