गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी रत्नागिरीत तिसरा डोळा तैनात

26 ठिकाणी 80 कॅमेऱ्यांद्वारे वॉच 

रत्नागिरी:- चोरट्यांनो सावधान! पोलिसांचा तिसरा डोळा तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. गुन्हेगारीला आळा बसावा तसेच झालेल्या गुन्ह्यांची उकल तत्काळ व्हावी यासाठी शहर पोलिसांनी शहरातील २६ ठिकाणी ८० कॅमेरे बसविले असून पोलिसांचा आता नाक्यानाक्यात सीसीटीव्ही वॉच सुरू झाला आहे. 

घरफोड्या, रस्ते अपघात आणि  वाहनचोरीच्या घटना याची उकल करणे काहीवेळा आव्हानात्मक बनते. रात्री होणार्‍या घरफोड्या तसेच अज्ञात वाहनाची ठोकर आणि पार्किंग केलेल्या दुचाकी चोरून नेण्याचे प्रकार यापूर्वी घडले होते. अशावेळी गुन्ह्याची उकल करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरते. काही वेळा तर सराईत गुन्हेगारच अशा घटनांमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न होत आहे. पोलिसांवरील कामाचा ताण कमी व्हावा, तसेच तपासात मदत व्हावी यासाठी सीसीटीव्ही वॉच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रत्नागिरी शहर पोली स्थानकाच्या हद्दीत २६ ठिकाणी ८० कॅमेरे दिवसरात्र वॉच ठेवणार आहेत. 

साळवी स्टॉप, नवलाई मंदिर नाचणे, मारुती मंदीर, उद्यमनगर, मजगाव तिठा, माळनाका, जेल नाका, सिव्हिल हॉस्पिटल, जयस्तंभ, रामनाका, भुते पान शॉप, भाट्ये चेकपोस्ट, परटवणे, सावकर चौक, हिंदू कॉलनी, मांडवी ब्रीज, मिरकरवाडा, काजरघाटी तिठा, विमानतळ, पंधरामाड, भाट्ये ब्रीज, गोखले नाका, मच्छिमार्केट, लाला कॉम्प्लेक्स, आरटीओ ऑफीस चौक आणि जेके फाईल्स आदी ठिकाणी कॅमेरे वॉच ठेवणार आहेत. काही ठिकाणी कॅमेर्‍यांचा वॉच सुरूदेखील झाला आहे.शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत २६ ठिकाणी ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसल्याने पोलिसांवरील ताण आता कमी झाला आहे. हे कॅमेरे दिवसरात्र वॉच ठेवणार असून पोलीस तपासातदेखील कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता असून आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही कॅमेर्‍याची संख्या वाढवणार असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.