गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातून हंगामातील सर्वाधिक हापूस नवी मुंबईला

रत्नागिरी:-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोकणातून नवी मुंबईतील फळबाजारात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक आंबा दाखल झाला आहे. मुहूर्ताच्या 34 हजार पेट्या प्राप्त झाल्याची माहिती फळबाजारातून सांगण्यात आली. दरवर्षी सरासरी 60 हजारहून अधिक पेटी आंबा कोकणातून मुहूर्ताला जातो. पण यंदा उत्पादन कमी असल्याने चाळीस टक्के घट झाली. आवक वाढल्याने दोनशे ते पाचशे रुपये दरात घट झाली आहे.

साडेतीन महुर्तापैकी एक असल्यामुळे कोकणातील बहूतांश बागायतदार गुढीपाडव्याला आंबा बाजारात पाठवतात. वीस वर्षांपुर्वी या दिवसाला सर्वाधिक महत्व होत. सध्या मार्च महिन्यात अधिकाधिक आंबा बाजारात पाठवून नफा मिळवण्याचा हेतू बागायतदारांचा असतो. दर चढे असल्याने गुढीपाडव्याच्या मुहूर्ताची प्रथा काही अंशी मागे पडत चालली आहे. वातावरणातील बदलामुळे यंदा हापूसचे उत्पादनच कमी आहे. पहिल्या टप्प्यात अवघ्या 20 टक्केच माल बाजारात पाठवता आला. त्यामुळे नवी मुंबईतील फळबारात मार्च महिन्यात सरासरी 15 ते 20 हजार पेट्या जात होत्या. परिणामी एप्रिल महिन्यातील दर चढे राहीले आहेत. गुढीपाडव्याला मुहूर्त साधत आंबा बागायतदार मोठ्याप्रमाणात पेट्या पाठवतील अशी शक्यता होती. त्यानुसार कोकणातून 34 हजार पेटी आंबा वाशीमध्ये दाखल झाला. अनेकांनी हा मुहूर्त साधण्यासाठी दोन दिवसांपुर्वी काढणी केली होती. सोमवारी (ता. 12) रात्री 409 गाड्या रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून रवाना झाल्या. दरवर्षी 60 हजाराच्यावर पेट्या वाशीत जातात. पण यंदा उत्पादनच कमी असल्याने कमी पेट्या गेल्या आहेत. आवक कमी असल्यामुळे दर 2 हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत होते. आज आवक थोडी वाढल्यामुळे डझनाच्या दरात थोडी घट झाली. हा दर एप्रिल अखेरपर्यंत कमी राहील असा अंदाज वर्तविला जात आहे.