गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लसीकरण पुन्हा सुरू होणार; 19 हजार 200 डोस प्राप्त

रत्नागिरी:- साठा नसल्याने जिल्ह्यातील लसीकरण मोहीम बंद पडली होती. सोमवारी (ता. 12) कोल्हापूर येथून कोविशिल्ड लसीचे 19 हजार 200 डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे बंद पडलेली मोहीम गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा सुरु होत आहे. 112 लसीकरण केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे.
 

जिल्हा आरोग्य विभागाने 1 लाख 90 हजार डोस मागितले असून टप्प्याटप्प्याने डोस मिळतील असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्याला लस मिळावी यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी
आरोग्य संचालक अर्चना पाटील यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर एकाच दिवसात जिल्ह्याला अपेक्षेपेक्षा अधिक डोस मिळाले आहेत. सोमवारी सकाळी कोल्हापूर येथून डोस घेऊन वातानुकूलीत गाडी सायंकाळी रत्नागिरीत दाखल झाली. कोरोनापासून सरंक्षणासाठी लसीकरण मोहिम वेगाने सुरु करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 84 हजार 337 लाभार्थ्यांना पहिला डोस तर 13 हजार 256 जणांना दुसरा डोस देण्यात आला. जिल्ह्यात 62 प्राथमिक आरोग्य केंद्र, 7 ग्रामिण रुग्णालय, 3 उप जिल्हा रुग्णालय, 1 जिल्हा रुग्णालय तसेच 3 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 7 खाजगी रुग्णालय अशा 112 केंद्रावर लस दिली जाते. लस नसल्यामुळे चारच केंद्रावर मोहीम सुरु होती. साठा प्राप्त झाल्यामुळे पुन्हा लसीकरणाला वेग येणार आहे.

जिल्ह्यात दिवसाला दोनशे हुन अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कोरोना लस मिळावी अशी मागणी होत आहे. 45 वर्षांवरील जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करुन घ्यावे. तसेच दुसरा डोस शिल्लक आहे, अशा लाभार्थ्यांनी योग्य कालावधीनंतर तो घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी केले आहे.