रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी फाटा ते गणपतीपुळे रस्त्यावर हानिकारक गुटखा वाहतूक करणाऱ्या तीन संशयिताना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १५ लाख २९ हजार ११६ रुपयांचा मोटारीसहीत मुद्देमाल जप्त केली. न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
संकेत शिवाजी चव्हाण (२०, रा. फणसोप सडा, रत्नागिरी), विशाल बळवंत घोरपडे (३२, रा. खटाव-मिरज जि. सांगली, सध्या फणसोप सडा, रत्नागिरी), सुरज राजू साळुंखे (३३, रा. पुणे घायरी तानाजी नगर, पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता. ११) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास निवळी ते गणपतीपुळे जाणाऱ्या रस्त्यावर घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती त्याद्वारे अन्न औषध प्रशासन व पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. निवळी येथे तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोटारीसह १५ लाख २९ हजार ११६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. तिघांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवारी (ता. १६) जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.