गितेश मुरटे आत्महत्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

गुहागर:- गुहागर तालुक्यातील कोकण एलएनजीमध्ये पॅन्ट्री विभागात सुपरवायझर म्हणून कामाला असलेल्या गितेश मुरटे यानी गळफास लावून केलेल्या आत्महत्येप्रकरणी कोकण एलएनजीच्या अधिकाऱ्यासमवेत दोन कामगार अशा तिघांवर गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी ही घटना घडली होती. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कोकण एलएनजीमधील अधिकारी कुमार स्वामी बटुला, (५३, आरजीपीपीएल कॉलनी), राहुल रघुनाथ रहाटे, (३४, जानवळे), साहील संतोष महाडिक, (२५, पालपेणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

आत्महत्या करणारा गितेश विलास मुरटे, (३१, मूळ अंधेरी इस्ट, मुंबई.) नोकरीनिमित्त गुहागर बाग येथे भाड्याच्या घरामध्ये रहात होता. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी त्याने भाड्याच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

याप्रकरणी त्याचा भाऊ श्रीकांत विलास मुरटे याने गुहागर पालीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार या घटनेचा पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनावणे अधिक दि तपास करत होते. तिघांनी मृत गितेश मुरटे याला क्षुल्लक कारणावरून तसेच कामाचा दबाव टाकून, वारंवार उद्धटपणे बोलून मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.