रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यातून आलेल्यांपैकी सुमारे तिस हजाराहून अधिक चाकरमान्यांची कोरोना चाचणी तात्काळ करुन घ्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य यंत्रणेला दिला आहेत. गावपातळीवर होणार्या चाचण्यांकडे झालेल्या दुर्लक्षाबाबत जिल्हाधिकारी यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे चाकरमान्यांच्या चाचण्यांवर भर दिला जाणार आहे.
गणेशोत्सवासाठी गावी येणार्या चाकरमान्यांसाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहिर करतानाच लसीचे दोन डोस घेतलेले किंवा आरटीपीसीआर चाचणी केलेल्या चाकरमान्यांना प्रवेश देण्यात येणार होता. चाचण्या न केलेल्यांची यादी महामार्गावरील चेकपोस्टवर घेण्यात आली होती. ती यादी दर दिवशी ग्रामकृतीदलाकडे सुर्पूद करण्यात आली आहे. गावपातळीवर आरोग्य यंत्रणेकडून त्यांच्या चाचण्या करणे बंधनकारक होते; परंतु गणेशोत्सवाच्या घाईगडबडीत गावात आलेल्या चाकरमान्यांच्या चाचण्यांकडे दुर्लक्ष झाले. गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात सुमारे 1 लाख 900 चाकरमानी आल आहेत. त्यात रेल्वेतून सुमारे 31 हजार, एसटी बसने 24 हजार, खासगी बसने अडीच हजार आणि खासगी वाहनातून 22 हजार 200 चाकरमानी आले. यापैकी दोन डोस घेतलेले आणि आरटीपीसीआर केलेल्या 61 हजार 916 जणांना थेट प्रवेश देण्यात आला. कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या 77 व्यक्ती सापडल्या. प्रशासनाने 725 जणांची आरटीपीसीआर आणि 8 हजार 135 जणांची अॅन्टीजेन टेस्ट केली. 31 हजार 140 जण कोरोना टेस्ट न करता गावात पोहचले आहेत. त्यांची नावे ग्रामकृतीदलाकडे पाठविण्यात आली होती.
गणेशोत्सव सुरु होऊन दोन दिवस झाले आहे. चाचण्यांची संख्या कमी झाल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक तालुक्यातील आरोग्य अधिकार्यांकडून प्राथमिक आरोग्य केंद्राना पत्र काढून तत्काळ चाचण्या करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसे न झाल्यास त्या-त्या आरोग्य केंद्रातील जबाबदार अधिकार्यांनी स्वतः जिल्हाधिकार्यांपुढे खुलासा सादर करावा असे सुचित केले आहे. सर्वचजणं गणेशोत्सवात व्यस्त असल्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चाचण्यांच्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.