रत्नागिरी:- तालुक्यातील गावडे आंबेरे येथील स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहिरीत रविवारी सकाळी आढळून आलेल्या दोन अज्ञात प्रौढांची ओळख पटली असून ते मूळचे नेपाळ येथील आहेत.
रामचंद्रप्रसाद नारायणप्रसाद अरयाले (54) आणि रेशम पूर्णबहाद्दूर सारली (64, दोन्ही मूळ रा. नेपाळ सध्या रा.गावडे आंबेरे, रत्नागिरी) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. या दोघांनाही दारूचे व्यसन होते,अशी माहिती गुरुवारी नेपाळहुन गुरुवारी रत्नागिरीत आलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
रविवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा.पूर्वी गावडे आंबेरे येथील विहिरीत दोन अज्ञात मृतदेह आढळून आले होते. याबाबत गावडे आंबेरे येथील पोलिस पाटील आदिती लाड यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिल्यानंतर पूर्णगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव धेत मृतदेहांचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला होता.
विहिरीत दोन मृतदेह सापडून आल्यामुळे यात घातपात असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता. परंतु पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून दोन्ही मृत हे नेपाळ येथील असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. गुरुवारी मृतांचे नातेवाईक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यावर दोन्ही मृतांची ओळख पटली आहे.सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरु होती.