रत्नागिरी:- कोरोनाच्या महामारीमुळे जिल्ह्यातील सुमारे ५०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पंचवार्षिक निवडणुका होऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड होईपर्यंत गावचा कारभार हाकण्यासाठी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मूळ कार्यालयाचा कारभार आणि प्रशासक म्हणून ग्रामपंचायतीचा कारभार अशा दोन्ही ठिकाणचा कारभार हाकताना ते मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणची कामे अर्धवट होत आहेत.
कोरोनाच्या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी गेल्या मे ते जुलै दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्या कधी होणार आहेत, याबाबत अद्याप निश्चित माहिती नसली, तरी प्रशासनाने या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पूर्वतयारी सुरू केली आहे.
त्यामुळे निवडणुका लवकर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र निवडणुका लांबणीवर पडलेल्या या ग्रामपंचायतींवर नव्या पदाधिकार्यांची निवड होईपर्यंत गाव कारभार हाकण्यासाठी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आल्या आहेत. सद्यःस्थितीमध्ये मे-जून महिन्यापासून पंचवार्षिक मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांमार्फत हाकला झाला आहे. त्यासाठी पंचायत समिती स्तरावर विस्तार अधिकारी आणि समकक्ष पदे असलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्या आहेत. पंचायत राज व्यवस्थेतील शेवटचा घटक असलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभाराचा विस्तार मोठा आहे. ग्रामपंचायतींचा कारभाराचा थेट सामान्य लोकांशी संबंध येत असल्याने लोकांची कामे प्रशासकांना वेळेत करावी लागतात. ग्रामपंचायत पातळीवरील छोट्या-मोठ्या बैठकांना हजेही लावावी लागते. एकेका प्रशासकाकडे एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कारभाराची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रशासकांना ग्रामपंचायतींना जास्तीत जास्त वेळ द्यावा लागतो. त्याच वेळी या प्रशासकांना स्वतःच्या मूळ कार्यालयाचा कारभारही पाहावा लागतो. त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना चालण्यासारखे नसते. अशा स्थितीत प्रशासकांना दोन्ही ठिकाणचा कारभार हाकताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामध्ये दोन्ही ठिकाणी अपेक्षित असलेल्या कामांना न्याय देण्यात अडचणी येतात. टाकलेला विश्वास आणि जबाबदारीला आपल्या परीने पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करतो, अशी प्रतिक्रिया काही प्रशासकांनी व्यक्त केली.