गाडीच्या पार्टचा अपहार करून एक लाखाची फसवणूक

खेड:- बंद पडलेली तवेरा गाडी दुरुस्त करून देतो असे सांगून, विश्वास संपादन करत तवेरा गाडीचे पार्ट व टायरचा अपहार करून एक लाख रुपयाची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. हा प्रकार कळंबनी, ता. खेड येथे घडला.

या फसवणूकीची फिर्याद जयसिंग रोंगाजी कांबळे (वय-७५, सेवानिवृत्त, सध्या रा. खारेगांव-कळवा, जि. ठाणे, मूळ रा.कशेळी पाली, ता. जि. रत्नागिरी) यांनी येथील पोलीस स्थानकात दिली. या नुसार संशयीत आरोपी वसीम अब्दुल्ला तांबे (रा-भरणे, ना. खेड) याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१६ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपी वसीम अब्दुल्ला तांबे याने फिर्यादी जयसिंग कांबळे यांची बंद पडलेली तवेरी गाडी दुरुस्त करून देतो असे सांगून श्री. कांबळे यांचा विश्वास संपादन करून तवेरा गाडी दुरुस्तीकरीता आपल्याकडे ठेवून घेतली. तसेच फिर्यादी श्री. कांबळे यांना कोणत्याही प्रकारची कल्पना न देता त्यांचा विश्वासघात करून त्यांच्या तवेरा गाडीचे दोन नवीन कॉन्टीनेटल कंपनीचे टायर काढून त्याठिकाणी एमआरएफ कंपनीचे जुने टायर लावून दिले. तसेच गाडीचे इंजिन खोलून त्याचे काही पार्ट खोलून श्री. कांबळे यांची सुमारे १ लाख रुपये किमतीची फसवणूक केली.