गस्तीनौका प्राप्त होऊनही परप्रांतीय नौकांना अभय

कारवाई न झाल्यास आंदोलन;  पर्ससीन संघटनेचा इशारा 

रत्नागिरी:- अवैध मासेमारीवर कारवाई करण्यासाठी लागणारी गस्ती नौका महिनाभरापूर्वी मत्स्य व्यवसाय विभागाला प्राप्त झाली. परंतु, अद्याप अवैध आणि एलईडी प्रकाशात मासेमारी करणार्‍या परप्रांतीय मच्छीमार नौकांवर कारवाई करण्यात यश आलेले नाही. या परप्रांतीय मासेमारीवर कारवाई न झाल्यास समुद्रात आणि जमिनीवरही संघर्ष करण्याचा निर्धार पर्ससीन आणि पारंपरिक मच्छिमार संघटनांनी केला आहे.

गोवा, कर्नाटक, गुजरात, मलपी आणि सिंधुदुर्गातील मच्छीमार नौका रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात येऊन मासेमारी करत आहेत. राज्याच्या अधिकार क्षेत्रातील समुद्रात मासेमारी केली जाते. त्याचबरोबर अनेक नौका एलईडी प्रकाशात मासेमारी करत आहेत. त्यामुळे स्थानिक पर्ससीन आणि पारंपरिक मच्छीमार नौकांना मासळीच मिळेनासी झाली आहे. त्यामुळे पारंपरिक आणि पर्ससीन मच्छीमारांच्या संघटना संतप्त झाल्या आहेत.

जिल्ह्याच्या समुद्रात घुसखोरी करून मासेमारी होत असताना या परप्रांतीय नौकांवर कारवाईचा शुभारंभही झालेला नाही. महिनाभरापूर्वी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाला गस्ती नौका मिळाली आहे. परंतु, या नौकेच्या मदतीने स्थानिक मच्छिमार नौकांवरच कारवाई होऊ शकली आहे. परप्रांतीय नौका वेगाने पळून जात असल्याने कारवाईत अडथळे येतात.

एकीकडे स्थानिकांवर कारवाई होत असतानाच परप्रांतीय मात्र मासळीची लूट करत आहेत. आता अशा परप्रांतीय नौकांना घेरून समुद्रात संघर्ष केला जाणार आहे. त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्‍यांसह सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींना जाब विचारला जाणार आहे. जोपर्यंत परप्रांतीय नौकांवर कारवाईचा वेग वाढत नाही तोपर्यंत अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना शांत बसू देणार नाही, असा इशारा मच्छीमार नेते विकास उर्फ धाडस सावंत, नासीर वाघू, विजय खेडेकर यांनी दिला आहे. या संघर्षासंदर्भात नुकतीच दोन्ही संघटनांची बैठक होऊन संघर्षाबाबतीत नियोजनाची चर्चा झाली.