गवा रेड्याचा तरुणावर हल्ला; पोटात खुपसली शिंगे

चिपळूण:- जंगलात गुरे चरवण्यासाठी गेलेल्या तरुणावर गवा रेड्याने हल्ला चढवला. तरूणाच्या पोटात शिंगे घुसवल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. ही घटना मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास चिपळूण तालुक्यातील फुरुस येथे घडली. 

 फुरूस बौद्धवाडी येथील शेतकरी सतीश शांताराम जाधव हा मंगळवारी नेहमीप्रमाणे गुरे चरण्यासाठी गेला होता. त्याच्या सोबत त्याचा भाऊ ही होता. गुरांच्या कळपातून एक बैल भरकटल्याने त्याला आणण्यासाठी सतीश जाधव गेला असताना त्याच्यावर अचानक गव्याने हल्ला चढवला. त्यामुळे सतीशने आरडाओरड केली. त्याचा आवाज ऐकून त्याचा भाऊ धावत आला आणि प्रसंग पाहून तोही भयभीत झाला. त्यानेही आरडाओरडा केला मात्र त्याच्या मदतीला कोणीच धावून आले नाही. सतीशला कसेबसे त्याने सोडवले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सतीशला डेरवण रुग्णालयात दाखल केले. सतीश जाधव याच्या पोटात गव्याची शिंगे घुसली आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या जखमा झाल्या आहेत. सतीश अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल होताच तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. 

जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचाही मुक्त संचार पाहायला मिळत आहे. बिबटे, माकडं वानरे यांचा वावर हा नित्याचाच आहे. त्यात आता गव्यांची भर पडली आहे. गव्याचे भर दिवसा हल्ले करण्याचे प्रकार वाढत आहेत. जंगल भागात असलेल्या या बिबट्या गव्याचे दर्शन आता वाडी वस्तीत घडत असल्याची माहिती वनविभागाला देऊन सुद्धा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तातडीने या प्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी देखील संतप्त नागरिकांनी केली आहे.