गलबतांच्या इतिहासाची ‘काजळी’त पुनरावृत्तीचा निर्धार

चिंद्रवलीत चला जाणूया नदी उपक्रम

रत्नागिरी:- काजळी नदीवरील चांदेराई येथे मोठी गलबते ये-जा करत असल्याचा इतिहास आहे.
त्यादृष्टीने चांदेराई बंदराची पुन्हा उभारणी करण्यासाठी प्रशासन आणि लोकसहभागातून उपायोजना करण्यावर चर्चा झाली. नदीचे आरोग्य जपण्याचा निर्धार चिंद्रवली येथे झालेल्या चला जाणूया नदीला कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ यांनी संयुक्तपणे केला.

चिंद्रवलीत झालेल्या कार्यक्रमाला काजळी किनार्‍यावरील नागरीक, शेतकरी, व्यवसायीक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी सहभागी होते. काजळी नदीची भौगोलिक परिस्थिती आणि काठावर वसलेले चांदराई, चिंदवली, उमरे, कोंडवी गावाचे भौगोलिक महत्त्व यावेळी सांगण्यात आले. चांदेराई बंदराला 1 लक्ष कौले (घरासाठीचे नळे) घेऊन येणार्‍या गलबतांचा ईतिहास आहे. नदी प्रवाह व नदी काठावरील जैवविविधता आणि गोड्या पाण्यातील जैवविविधता आणि त्या वर आधारित लोक जीवन त्याचे संगोपन करणे आवश्यक आहे. चांदेराई बाजारपेठेला पुराचा धोका असून त्यापासून संरक्षित करण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत. ही परिस्थिती निरंतन टिकून ठेवण्यासाठी लोकसहभागातून उपाययोजना करावयाच्या आहेत. काठावरील भागात वृक्षारोपण, पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पनेवर आधारित नदी पात्रात गेटेड बंधारे बांधणे, चांदेराईला येणारे खारे पाणी नियोजनासाठी पर्यायी भूमिगत बंधारा बांधणे, मत्स्य आधारित व्यवसाय उभारणी करणे अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या. नौकावहनाचे गतवैभव परत आणण्यासाठी आणि चांदेराई बंदराची उभारणी करण्याच्या उद्देशाने नियोजन केले पाहीजे. किनारी गावांमध्ये फळबाग लागवड मोठ्याप्रमाणात करता येऊ शकते. यावर कृषी प्रात्यक्षिके नियोजन करण्याचा निर्णय झाला. मनरेगा तसेच इतर योजनांमार्फ वृक्षरोपणासाठी वृक्ष उपलब्धता आणि त्या संबधीत करावयाचे पूर्तता यांचे वनसंरक्षक अधिकार्‍यांनी माहिती दिली. एमआयडीसीच्या चांदेराई येथील धरणात गाळ साठलेला आहे. तेथील गाळ उपसा करणे आवश्यक आहे. याबाबत नियोजन करण्यात आले.
गट विकास अधिकारी श्री. जाधव म्हणाले, नदी संवर्धन करताना एक समाज या दृष्टिकोनातून सकारात्मक ग्राम नियोजन आराखडा केला पाहीजे. सर्व समावेक्षक नदी संवर्धन एकोपा जोपासत उपलब्ध जैवविविधतांचे संगोपन करण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत.

जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकार्‍यांनी काजळी नदी विषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. या अभियानाचे उद्घाटन गट विकास अधिकारी जे. पी. जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुका कृषी अधिकारी एन. पी. भोईये, मंडळ कृषी अधिकारी एम. व्ही. बापट, कृषी पर्यवेक्षक आर. के. डवरी, श्री. ठाकरे, एस. बी. कदम, वनरक्षक श्री. प्रभू-सावणे, काजळी नदी नोडल अधिकारी श्री. तिरमारे उपस्थित होते.