रत्नागिरी:- रत्नागिरी हातखंबा रस्त्यावरील गयाळवाडी येथे दुचाकीस्वाराने बसचालकाला मारहाण केली तसेच दगड फेकून मारुन बसचे दोन्ही आरसे फोडले. ही घटना रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. अजय भगवान पोटभरे (32, रा. कारवांचीवाडी रत्नागिरी) असे जखमी बसचालकाचे नाव आहे.
पोटभरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मोटारसायकलस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. श्वेतांग वायंगणकर (रा रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अजय पोटभरे हे 29 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या ताब्यातील रत्नागिरी-नृसिंहवाडी बस (एमएच 20 बीएल 1254) घेवून जात होते. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बस गयाळवाडी येथील रस्त्यावर आली असता आरोपी श्वेतांग वायंगणकर याने बसपुढे दुचाकी आडवी आणली तसेच बसचालक याला बस थांबविण्याचा इशारा केला. त्यानुसार बस चालक अजय पोटभरे यांनी रस्त्याकडेला बस उभी केली.
यावेळी संशयित आरोपी श्वेतांग याने बसचालक अजय पोटभरे यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच दगड फेकून मारत बसचे आरसे फोडून नुकसान केले, अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिसांनी श्वेतांग वायंगणकरवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.