सामाजिक सलोखा राखत धार्मिक उत्सव साजरे करावेत: जिल्हाधिकारी
रत्नागिरी:- कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेऊन, सामाजिक सलोखा राखत धार्मिक सण-उत्सव आनंदात आणि शांततेत साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.
जिल्हास्तरीय शांतता व समन्वय समितीची बैठक आज झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पोलीस उपअधिक्षक विनित चौधरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, राजश्री मोरे, जीवन देसाई, विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या नागरिकांसाठी महामार्गावर मदत केंद्र ठेवण्यात येत आहेत. खासगी बसेस तसेच स्टेशनपासून येणाऱ्या रिक्षाभाड्याबाबत योग्य भाडे आकारणी करण्यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन विभागाने आपल्या स्तरावर बैठक घ्यावी. यामध्ये संबधितांना निमंत्रित करावे. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात येत आहे. तहसीलदार स्तरावर देखील यासंदर्भात सर्वांनी बैठक घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकारण, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी रस्त्यांवरील खड्डे तात्काळ भरुन घ्यावेत.
पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, जादा भाडे आकारले गेल्यास संबधित रिक्षा चालकावर कारवाई केली जाईल. 14 ठिकाणी महामार्गावर मदत केंद्र उभारण्यात येत आहेत. रेल्वे स्टेशन आणि आवश्यक त्या ठिकाणी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल. राज्याला दिशा देणारे या जिल्ह्याचा गणेशोत्सव असतो यात सर्वांची भुमिका महत्वाची असते.
यावेळी उपस्थित सदस्यांकडून आलेल्या सूचनांची दखल घेत त्यावर कार्यवाही केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. बैठकीला युयुत्सु आर्ते, मुश्ताक टेंमकर, मिनल जोग, मनोजकुमार खानविलकर, संतोष पाध्ये,निसार काझी, मुश्ताक मिरकर, राहूल पवार, हानिफ हरचिरकर, संजय बामणे, गुरुप्रसाद सावंत, महमद रफिक बिजापूरी, मुक्ती सारंग, पत्रकार प्रणव पोळेकर, हेमंत वणजू, मुकेश गुण्देचा आदी उपस्थित होते.
प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या स्तरावर गणेशोत्सव निमित्त पूर्व तयारी आढावा बैठक घ्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी दिली. गणेशोत्सव 2023 निमित्त पूर्व तयार आढावा बैठक आज घेण्यात आली. जिल्हाधिकारी म्हणाले, आरोग्य विभागाने रुग्णवाहिका उपलबध ठेवाव्यात. महामार्गालगत उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय याठिकाणी आवश्यक वैद्यकीय सुविधा तैनात ठेवावी. महावितरणने विशेष दक्षता घेऊन वीज पुरवठा सुरळीत ठेवावा. वाहने दुरुस्त करणाऱ्या मॅकेनिकची यादी तयार ठेवावी.