गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील खड्डे भरण्याचे रनपकडून नियोजन

रत्नागिरी:- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरून आरोप, टीका होऊ नये यासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने अगोदरच खड्डे भरण्याचे नियोजन केले आहे. पावसाळी डांबर आले असून, खडी-डांबराने लवकरच खड्डे भरण्याची कार्यवाही सुरू होणार असल्याचे बांधकाम विभागाचे अभियंता यतीराज जाधव यांनी सांगितले.

दरवर्षी रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या खड्ड्यावरून राजकीय पक्षांकडून जोरदार रणकंदण माजवले जाते. गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना खड्ड्यांचा त्रास होऊ नये यासाठी राजकीय पक्षाचे नेते पुढे येतात. प्रत्येकवेळी सत्ताधार्‍यांना कचाट्यात पकडले जाते. परंतु, यावेळी प्रशासक असल्याने पालकमंत्री उदय सामंत किंवा राज्यातील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीला त्यांच्या विरोधकांकडून धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांना ही संधीच मिळू नये यासाठी रत्नागिरी
नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या सूचनेनुसार बांधकाम विभागाने आधीच तयारी करून ठेवली आहे.

यंदा पाऊस कमी झाल्याने खड्डेही कमी प्रमाणात पडले आहेत. बंदररोड, मांडवी, टिळकआळी, काँग्रेसभुवन, जोशीपाळंद अशा काहीच ठिकाणी खड्डे पडले आहेत. यापूर्वी डबरने खड्डे भरले असल्याने वाहनधारकांचा मन:स्तापही कमी झाला आहे. शहरातील सर्वच खड्डे भरण्याचे काम लवकरच सुरू करून ते गणेश आगमनापूर्वी पूर्ण होईल, असा विश्वास बांधकाम विभागाकडून व्यक्त करण्यात आला.