गणेशमूर्ती आगमन, विसर्जन मिरवणूक नाही 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जाहीर 

रत्नागिरी:- गणपतीच्या दर्शनास नातेवाईक, मित्रमंडळी यांना बोलवू नये, तसेच आपणही नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक गौरीपूजन, सत्यनारायण पूजा अशा कार्यक्रमात सहभागी होऊ नये, तसेच ध्वनिप्रदूषण संदर्भातील नियमांच्या तरतुदींचे पालन करण्यात यावे, गणेश मूर्तीचे आगमन, विसर्जनावेळी मिरवणूक काढता येणार नाही, तसेच गर्दी होईल, असे कोणतेही कृत्य करता येणार नाही, अशा सूचना आज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी जिल्हावासीयांना केल्या आहेत.

याकाळात कायदा आणि सुव्यवस्था भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी. गणेशोत्सव काळात बाहेरुन येणार्‍या लोकांच्या बाबतीत ज्या मार्गदर्शन सुचना आहेत, त्यांचे तंतोतंत पालन यंत्रणांकडून होणे बंधनकारक आहे. तहसीलदारांनी आगार व्यवस्थापकांकडून प्राप्त झालेली यादी ग्रामकृती दलाकडे पाठवावी. जेणेकरुन येणार्‍या लोकांची संख्या आणि नावे कृती दलाला समजू शकेल आणि त्यांचेवर लक्ष ठेवणे सुलभ होईल. कृती दलांना जास्तीत जास्त कार्यान्वित होण्याबाबत सूचना देण्यात याव्या.