गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तीन पर्यटकांना जीवदान; मोरया वॉटर स्पोर्टच्या सदस्यांकडून मदतकार्य

रत्नागिरी:-रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रात शुक्रवारी सायंकाळी 4.30 वा. सुमारास विकास जाधव वय-46 वर्षे, संजना जाधव वय-40 वर्षे, अंचल करंजे वय-21 वर्षे सर्व रा.इंचलकरंजी ता.हातकणंगले जि.कोल्हापुर हे देवदर्शन करून गणपतीपुळे समुद्रात अंघोळ करताना समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने लाटेसोबत खोल पाण्यात ओढले जावून पाण्यात बुडत असताना समुद्र किनारी असणारे मोरया वाॅटर स्पोर्ट्स चे सदस्यांनी स्पीड बोटच्या मदतीने त्वरीत बुडणा-या व्यक्तीं जवळ जाऊन त्यांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढून समुद्र किनारी घेऊन आले.

सध्या सर्वजण सुखरूप असून त्यांनी मोरया वॉटर स्पोर्टच्या बोटचालकांचे आभार मानले.या घटनेची माहिती मिळताच गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार मधुकर सलगर यांनी गणपतीपुळे समुद्र किनारी जाऊन बुडणाऱ्या पर्यटकांची चौकशी करून त्यांना मदतीचे सहकार्य केले तसेच गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या जीवरक्षकांनीही मोलाचे सहकार्य मोरया वॉटर स्पोर्ट च्या बोटचालकांना दर्शविले. एकूणच या महिन्यात सलग दुसऱ्यांदा मोरया वॉटर स्पोर्ट च्या बोट चालकांनी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवले असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सध्या गणपतीपुळे येथे पर्यटकांची उन्हाळी हंगामात चांगलीच वर्दळ होत असून पर्यटकांनी समुद्रस्नानाचा अतिउत्साह व अतिरेक न करता समुद्राच्या कमी पाण्यात आंघोळीसाठी उतरावे असे आव्हान गणपतीपुळे ग्रामपंचायत व जयगड पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच सध्या समुद्राच्या पाण्याचा प्रवाह देखील बदलला असून पाण्याला मोठा करंट असल्याने समुद्राचा धोका वाढला आहे त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांनी समुद्राच्या धोक्याची माहिती घेऊनच समुद्रात आंघोळीसाठी जावे अशी विनंती स्थानिक व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.