रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे येथील शासकीय विश्रामगृहाच्या दुरुस्तीतील गैरव्यवहार, निवळी, खंडाळा, जयगड आदी ठिकाणच्या मोर्यांच्या बोगस कामांची चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे. तत्कालीन शाखा अभियंता सुधीर कांबळे यांच्या अधिकार क्षेत्रात ही कामे झाली आहेत. सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 1 चे उपविभागीय कार्यकारी अधिकारी जनक धोत्रेकर यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी होत आहे.
गणपतीपुळे येथील शासकीय विश्रामगृहाचे नुतनीकरण झाले. परंतू जो कोट्यवधीचा खर्च झाला त्या तुलनेत झालेल्या कामांचे प्रमाण कमी आहे. रस्त्यावरच्या ज्या अनेक मोर्यांची दुरुस्ती, बांधणी झाली ती कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली असल्याच्या तक्रारी उपविभागीय अधिकारी जनक धोत्रेकर यांच्याकडे आल्या. यामध्ये बोगस एजन्सीमार्फत कामे करण्यात आली आहेत. मोर्यांमध्ये जुुनेच सिमेंट पाईप टाकण्यात आले आहेत. काही मोर्यांची किरकोळ डागडुजी करून घेण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. 1 मध्ये कार्यरत असणारे शाखा अभियंता यांच्या देखरेखीखाली ही निकृष्ट कामे झाली असल्याचा आरोप असून, त्यानुसार चौकशी सुरु झाली. जी कामे योग्यरित्या झाली होती, त्याची किरकोळ बिले अदा झाली आहेत. मात्र, इतर बहुसंख्य कामांची बिले अद्याप देण्यात आलेली नाहीत. ही चौकशी आता अंतिम टप्प्यात आली आहे.