गणपतीपुळे मंदिरात प्रत्यक्ष पूजा, महाप्रसादाला प्रारंभ

रत्नागिरी:-प्रसिध्द धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळेतील श्रींच्या मंदिरात गणपतीच्या प्रातिनिधीक मुर्तीसमोर प्रत्यक्ष पुजा आणि महाप्रसाद वितणाराला नुकतीच सुरवात झाली आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्ष शासनाच्या निर्देशानुसार देवस्थानकडून पुजा आणि प्रसाद बंद ठेवला होता. चार दिवसांपुर्वी याचा प्रारंभ झाला असून महाप्रसादाचा आठ हजाराहून अधिक भक्तगणांनी लाभ घेतल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर शासनाने दोन वर्षे निर्बंध घातले होते. गर्दी होणारी सर्वच ठिकाणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामध्ये पर्यटनस्थळं, मंदिरे यांचा समावेश होता. पहिली, दुसरी आणि तिसरी लाट ओसरल्यानंतर काही काळ मंदिरे दर्शनासाठी खुली केली होती; परंतु प्रत्यक्ष पूजा, महाप्रसाद यावर निर्बंधच होते. परिणामी देवस्थान समितींकडून फक्त भक्तगणांना दर्शन देण्यासाइी मंदिरे खुली करुन दिली होती. गेल्या महिन्याभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात कमी बाधितांची नोंद झाली असून लसीकरणही चांगल्या प्रकारे आहे. हे लक्षात घेऊन राज्य शासनाकडून निर्बंध शिथिल केले. परिणामी जिल्ह्यातील सर्वाधिक प्रसिध्द आणि भक्तांची श्रध्दा असलेल्या गणपतीपुळे मंदिर गजबजले. वर्षाच्या सुरुवातीला भक्तांना प्रत्यक्ष पुजा किंवा महाप्रसादाचा लाभ मिळत नव्हता. निर्बंध शिथिल झाल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार मंदिर व्यवस्थापनाकडून श्रींच्या प्रातिनिधीक मुर्तीची प्रत्यक्ष पुजा करण्यासाठी भक्तांना लाभ देण्यास आरंभ केला आहे. तसेच मंदिरामध्ये खिचडीचा महाप्रसादही सुरु केला आहे. पहिल्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी मिळून सुमारे पावणेदोन हजार भक्तांनी याचा लाभ घेतला. गेल्या चार दिवसात आठ हजाराहून अधिक भक्तांना प्रसादाचे वितरण केले गेले. प्रत्यक्ष पुजेसाठी अनेकांकडून सातत्याने विचारणा केली होती होती. गाभार्‍यात जाऊन पुजा करावयास मिळणार नसली तरीही प्रातिनिधीक मुर्तीपूढे पुजा करता येणार असल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले.

उष्णतेच्या लाटेचा पर्यटकांवर परिणाम

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गणपतीपुळेतील पर्यटकांचा राबता वाढला होता. शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन घेण्यास सुरवात झाली असून दहावी, बारावीसह सर्वच वर्गांच्या परिक्षाही चालू झाल्या आहेत. त्यामुळे फिरण्यासाठी येणारा वर्ग कमी झाल्याने गणपतीपुळेत शनिवार, रविवार वगळता पर्यटकांचा राबता यथातथाच असतो. गेल्या चार दिवसात उष्णतेची लाट आल्यामुळे किनार्‍यावर तुरळक पर्यटक असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.