गणपतीपुळे मंदिरातील उंदीरही बंदीस्थ 

रत्नागिरी:- गणपतीपुळेतील श्रींच्या दर्शनाला शेकडो भाविक येत आहेत. श्रींचे मुखदर्शन होत नसल्याने कुणी कळसाचे तर कुणी मंदिराबाहेरील उंदराच्या दर्शनावर समाधान मानतात. पण इथेही कोरोनाने पाठ सोडलेली नाहीच. उंदराच्या कानात सांगण्यासाठी तोंड जवळ नेत असल्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. या भितीने मंदिर प्रशासनाने उंदिराभोवती लोखंडी रेलींग केले आहे. आता मंदिराच्या दरवाज्याबाहेर उभे राहून दुधाची तहान ताकावर भागवल्याप्रमाणे हात जोडून निघून जात आहेत.

जिल्हा बंदी उठल्यानंतर दर्शनासाठी आतुर झालेले भक्तगण मंदिराच्या परिसरात येऊन दुधाची तहान ताकावर भागविल्याप्रमाणे बाहेरून दर्शन घेतल्याचे समाधान मानून निघून जात आहे. ही परिस्थिती रत्नागिरी तालुक्यातील प्रसिध्द गणपतीपुळे पर्यटन स्थळी दिसत आहे. दररोज शंभरहून अधिक भक्तगण दर्शनाच्या आशेने गणपतीपुळेत येत आहेत. कुणी कळस दर्शनावर तर कुणी मंदिराबाहेरील उंदीराच्या कानात इच्छा सांगून श्रींच्या दर्शनाची आस भागवत आहेत. उंदराच्या कानात सांगितलेली इच्छा ही थेट श्रींपर्यंत पोचते अशी भक्तांची श्रध्दा आहे. उंदीर हे गणपतीचे वाहन आहे. गणेश मंदिराजवळ उंदराची मुर्ती असतेच. त्याप्रमाणेच गणपतीपुळेमध्ये मंदिराबाहेर अशीच मुर्ती ठेवण्यात आली आहे. अनेक भक्तगण उंदराच्या एका कानात इच्छा व्यक्त करताना, दुसर्‍या कानावर हात ठेवतात. श्रींपर्यंत इच्छा, नवस बोलण्याचा उंदीर हा एक आधार होता. पण कोरोनाने इथेही भक्तांची पाठ सोडलेली नाही. हे करताना प्रत्येक व्यक्तीचे तोंड मुर्तीच्या कानाजवळ जाते. त्यातून कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. येथे येणारी प्रत्येक व्यक्त ही विविध जिल्ह्यातून येत आहेत. बहूतांश येणारा पर्यटक हा पश्‍चिम महाराष्ट्रासह मुंबई, पुण्यातील आहेत. या तिन्ही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात सापडत आहेत. उंदीर कोरोनाचा प्रसारक ठरु नये आणि भक्तांच्या आरोग्य रक्षणासाठी मंदिर प्रशासनाने उंदीराच्या भोवती लोखंडी रेलींग केले आहे. आता भक्तांना फक्त लांबून दर्शनाचे समाधान मिळत आहे. सध्या गणपतीपुळेत तरुण वर्गच मोठ्याप्रमाणात येत आहे.