रत्नागिरी:- चक्रीवादळामुळे कर्नाटक, गुजरात, मुंबईसह विविध भागातील मच्छीमारी नौकांनी जयगड बंदरात आश्रय घेतला होता. वादळ सरल्यामुळे परतीच्या प्रवासात याच परराज्यातील नौकांनी गणपतीपुळेपासून काही अंतरावर मासेमारी केली. त्यामुळे शनिवारी (ता. 26) सकाळपासून गणपतीपुळे ते जयगड परिसरात हजारो मच्छीमारी नौका मासेमारी करत होत्या. त्यांच्यासह स्थानिकाना म्हाकुळ, पापलेट, चालू चिंगळं, सरंगा यासारखी मिश्र मासळी मिळाली.
गेले आठवडाभर वादळामुळे समुद्र खवळल्याने हर्णैमधील नौकांसह परजिल्ह्यातील, परराज्यातीलच शेकडो नौका जयगड बंदरात आश्रयाला आल्या होत्या. शुक्रवारी वातावरण निवळल्यामुळे त्या नौकांनी घरचा मार्ग धरला. गणपतीपुळे ते जयगड या परिसरात प्रजननासाठी मासळी येते. पाऊस संपला की या भागात मोठ्याप्रमाणात मासे मिळतात. वादळ ओसरल्यानंतर खोल समुद्रात गेलेले मासे पुन्हा किनारी भागाकडे वळले आहेत. स्थानिक मच्छीमारांनी या भागात काही प्रमाणात मासेमारी सुरू केली. याची भनक परराज्यातून आलेल्या या मच्छीमारांना लागल्यामुळे माघारी परतत असताना माशांची खाण म्हणून ओळखल्या जाणार्या या भागात जाळी मारली, असे स्थानिक मच्छीमारांकडून सांगितले जात आहे.
गणपतीपुळेमधून नौकांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या. सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत या नौका मासेमारी करत होत्या. स्थानिक मच्छीमारांचा आधार असलेल्या भागावर परराज्यातील मच्छीमारांनी डल्ला मारल्यामुळे आधीच खड्ड्यात असलेल्या स्थानिक मच्छीमारांचे मोठे नुकसान होणार अशी चर्चा सुरू आहे. काळबादेवी, कासारवेली, जयगड, रत्नागिरीसह तालुक्यातील मच्छीमारी नौकाही मासेमारी करत होत्या.