रत्नागिरी:- बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गणपतीपुळे येथे रविवारी (ता. 11) सायंकाळी अचानक आलेल्या वेगवान लाटेेमुळे नुकसान झालेल्या 49 व्यावसायीकांना नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच किनार्यावर पर्यटकांना जाण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. देवस्थान प्रशासन, ग्रामपंचायतीचे जीवरक्षक आणि पोलिस संयुक्तपणे लक्ष ठेवणार आहेत.
रविवारी सायंकाळी हजारो पर्यटक किनार्यावर फिरत असताना सव्वापाच वाजण्याच्या सुमारास अचानक गणपतीपुळे किनार्यावर मोठी लाट धडकली. या लाटेपासून वाचण्यासाठी अनेक पर्यटक किनार्याकडे धावले, कुणी वाळूत पडले, तर लाटेच्या तडाख्यात सिमेंटच्या धक्क्यावर आपटले आणि जखमी झाले. किनार्यावरील नारळ व्यावसायीक, फेरीवाले यांचे साहित्य वाहून गेले. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पाहणीमध्ये 49 व्यावसायीकांचे छोटे-मोठे नुकसान झाले आहे. त्यातील दिनेश नावाच्या एका व्यावसायीकाची 27 हजार रुपयांची रोख रक्कम आणि अन्य साहित्य वाहून गेेले. आठ जणांचे दहा हजारापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या परिस्थितीची पाहणी सोमवारी (ता. 12) पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. तेथील व्यापाराशी चर्चा केली. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामेही करण्यात आले. यामध्ये पाच हजार चारशे रुपये सरसकट भरपाई दिली जाणार आहे. तर पालकमंत्री सामंत यांनी मोठे नुकसान झालेल्या वैयक्तिक दहा हजार रुपये जाहीर केले आहे. यावेळी सरपंच कल्पना पकीये, डॉ. विवेक भिडे, अमित घनवटकर, गजानन पाटील, कल्पेश सुर्वे, संदीप कदम, मुख्य पुजारी उमेश घनवटकर, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकासअधिकारी जे. पी. जाधव, महेश ठावरे, रवि ठावरे, महेश केदार, उमेश भणसारी, प्रकाश साळवी, अमित पाटील, राजू साळवी, अतुल पाटील असे सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, गणपतीपुळेमध्ये दर्शनासाठी पर्यटक अजुनही दाखल होत आहेत. दर्शन घेतल्यानंतर ते किनार्यावर फिरायला जातात. बिपरजॉय चक्रीवादळामुळे अजुनही समुद्राला उधाण असून धक्क्यापर्यंत पाणी येत आहे. भरतीवेळी लाटांची तिव्रताही वाढतेय. हे लक्षात घेऊन पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत आणि देवस्थानकडून किनार्यावर जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. आज सकाळी किनार्यावर दोरी बांधून ठेवण्यात आली आहे. तसेच जीवरक्षकांची करडी नजर आहे.
पर्यटकांनी मोह आवरा: पालमंत्री सामंत
पालकमंत्री सामंत यांनी पर्यटकांना आवाहन करत किनार्यावर न जाण्याची सुचना केली आहे. ते म्हणाले, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे समुद्र खवळला असून प्रवाह बदलत आहेत. येथे येणारे पर्यटक सुरक्षित राहणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे पोहण्यासाठी समुद्रात जाण्याचा मोह पर्यटकांनी आवरला पाहीजे.