गणपतीपुळेत बुडणाऱ्या दोघा पर्यटकांना जीवदान

रत्नागिरी:- गणपतीपुळे येथे खोल समुद्रात पोहायला गेलेल्या सांगलीतील दोघांना बुडण्यापुर्वीच किनार्‍यावरील जीवरक्षकांनी सुरक्षितरित्या बाहेर काढले. हा प्रकार रविवारी (ता. ४) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला. ते दोघेही रेड झोनमध्ये पोहायला गेले होते, अशी माहिती पुढे आली आहे.

पाच दिवसांपुर्वी गणपतीपुळे येथील समुद्रात विशिष्ठ ठिकाणी पाण्याच्या प्रवाहांमुळे निर्माण होत असलेल्या खड्ड्यात (चाळ) अडकून एक पर्यटक बुडणार होता; पण किनार्‍यावरील सागररक्षकांनी त्याला बाहेर काढला. पावसाळी वातावरणामुळे अजूनही समुद्र खवळलेला असून पाण्याला करंट आहे. पोलिस प्रशासनाने पोहणार्‍यांसाठी रेड झोन घालून दिला आहे; मात्र जीवरक्षकांकडून वारंवार सुचना देऊन याच धोकादायक ठिकाणी दोन पर्यटक पोहायला गेले होेते. त्यामध्ये भूषण हेमंत अडसूळे (२२), हेमंत सीताराम अडसूळे (४७) यांचा समावेश आहे. हे दोघेही सांगलीतील मिरज घनबाग येथील आहेत. लाटांमुळे ते दोघेही खोल पाण्यात आतमध्ये जात होते. ही बाब किनार्‍यावरील लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी आरडाओरडा करण्यास सुरवात केली. किनार्‍यावरील जीव रक्षक रोहित माने, हेमंत महादेव आणि स्थानिक व्यावसायिक अक्षय सुर्वे उर्फ बंटी शरद मयेकर यांनी पाण्यात जाऊन त्या दोघांनाही बाहेर काढले. जीवरक्षकांच्या प्रसंगावधानामुळे अनुचित प्रकार टळला. सुदैवाने त्यांना काहीच झालेले नव्हते. पाण्यातून बाहेर आल्यानंतर दोघांनाही सुचना देऊन जीवरक्षकांनी माघारी पाठवले. या प्रकारानंतर प्रशासनाकडून पर्यटकांना खोल समुद्रात धोकादायक ठिकाणी पोहण्यास जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.