रत्नागिरी:- न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेली अतिवेगवान जेट बोट गणपतीपुळेत आणण्याचा निर्णय नुकताच पर्यटन विभागाकडून घेण्यात आला आहे. यासाठी 2 कोटी 50 लाख रुपये मंजूर झाले असून ऑक्टोबर 2022 पर्यंत त्यामधून प्रवास करण्याचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे.
हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. कोकणातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 16 कोटी 92 लाखांच्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबतचे आदेश आज काढण्यात आले आहेत. यामध्ये गणपतीपुळे येथे येणार्या जेट बोटचा समावेश आहे. मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने हा जेट बोट क्लब सुरु होत आहे. यामुळे गणपतीपुळे जल पर्यटनाच्या माध्यमातून जगभरातून येणार्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. सुमारे 15 ते 20 पॅसेंजर बसण्याची या बोटीची क्षमता असून अवघ्या अर्ध्या तासात हि बोट गणपतीपुळे ते आरे वारे हे अंतर प्रचंड वेगात कापणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विभागाचे सल्लागार डॉ. सारंग कुलकर्णी यांनी दिली. भारतातील अतिवेगवान, अशी हि पहिली जेट बोट आहे. ही बोट जेट इंजिनावर चालते व तासाला 80 किलोमीटर अंतर पार करते. अर्ध्या फुट खोलीतील पाण्यावर सुद्धा या वेगवान जलसफारीचा आनंद घेता येतो. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशातून या बोटी पर्यटकांचे आकर्षण ठरल्या आहेत. या जेट बोटीसाठी कोणत्याही जेटीची आवश्यकता नसून गणपतीपुळे ते आरे वारे हे अंतर अर्ध्या तासात कापले जाणार आहे. या जेट बोटीची 1 तासाची व 15 मिनिटांची, अशा दोन सफारी असणार आहेत. 15 मिनिटांची सफर ही गणपतीपुळे आसपासच असणार आहे. अत्यंत वेगवान व साहसी जल सफारीचा आनंद यामुळे पर्यटकांना मिळणार आहे. यामुळे निश्चितच कोकणातील जलपर्यटनाची वाढ होणार आहे.