गणपतीपुळेत पर्यटकांच्या सुरक्षेसाठी समुद्रात रेड झोन 

रत्नागिरी:- पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गणपतीपुळे किनारी पोहण्यास धोकादायक असलेला भाग रेड झोन म्हणून तयार केला जाणार आहे. तसेच किनारी भागात जादा जीवरक्षक, पोहणार्‍यांना लाईफ जॅकट, सीसीटीव्ही कॅमेरे यासह भरती-ओहोटीच्या वेळा दर्शवणारे फलक येत्या काही दिवसात उभारण्यावर पोलिस प्रशासन, गणपतीपुळे ग्रामपंचायत, देवस्थान आणि ग्रामस्थ यांच्या चर्चा झाली.

गणपतीपुळे किनारी गुरुवारी (ता. 16) दोन पर्यटक समुद्रामध्ये पोहताना बुडाले. त्यातील एकाचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आले. कोरोनामुळे पर्यटकांचा राबता कमी असला तरीही दिवसातून शंभर पर्यटक ये-जा करतात. काही दिवसांपुर्वी गणपतीपुळे ग्रामपंचायतीने जीवरक्षक नेमले होते; परंतु खवळलेला समुद्र आणि पोहणारे खोल पाण्यात गेल्यामुळे त्यांना वाचवण्यात अनंत अडचणींचा सामना जीवरक्षकांना करावा लागला होता. हा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीत बैठक झाली. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक जयश्री देसाई, जयगड सहायक पोलिस निरीक्षक जे. एच. कळेकर, सरपंच कल्पना पकये, उपसरपंच महेश केदारी, गणपतीपुळे मंदिर देवस्थानचे अमित मेहंदळे, जीवरक्षक, पोलिस मित्र  व काही ग्रामस्थ उपस्थित होते.

गणपतीपुळे किनारी 2007 पासून आतापर्यंत बेचाळीसहून अधिक जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. गेल्या तिन वर्षात एकही प्रकार घडलेला नव्हता. कोरोनामुळे देवस्थान बंद असल्यामुळे किनार्‍यावर येणार्‍या पर्यटकांची संख्या कमी आहे. टाळेबंदी आणि कडक निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसाय थांबला आहे. गणपतीपुळेमध्ये पुन्हा बुडण्याचा प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने उपाययोजना सुचवल्या आहेत. किनार्‍यावर आतापर्यंत किती मृत्यू झाले त्याचे फलक आणि भरती-ओहोटीचे वेळापत्रक लावण्यात येणार आहे. मेगा फोन आणि जीवरक्षकांची संख्या वाढवण्यात येणार आहे. सध्या दहा जीवरक्षक ग्रामपंचायतीकडून ठेवण्यात आले आहेत. मंंदिर व्यवस्थापनही दोन सुरक्षा रक्षक नेमते. पर्यटकांना लाईफ जॅकेट देण्यात येणार आहे. तसेच किनार्‍यावरील धोकादायक स्पॉट ठरवून तेथे लाल झेेंडे लावले जातील. देवस्थानकडून सीसीटीव्ही लावण्यात आले होते. ते खराब झाले असून पुन्हा ते सुरु करण्यात येणार आहेत. एमटीडीसीच्या जवळ दोन वॉच टॉवर आणखीन नव्याने लावले जाणार आहेत. तसेच तात्पुरत्या बोट ठेवण्यावरचही चर्चा झाली. यासाठी लागणारा निधी कोणत्या फंडातून खर्च करावयाचा याचेही नियोजन करण्याबाबत श्रीमती देसाई यांनी सुचना केल्या.