रत्नागिरी:-खोल पाण्यात पोहत जाणार्या दोघा पर्यटकांना मोरया स्पोर्टस्च्या जेट स्की चालकांनी वेळीच माघारी आणल्यामुळे दुर्घटना टळली. हा प्रकार गुरुवारी (ता. 5) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गणपतीपुळे किनारी घडला.
उन्हाळी सुट्ट्यांमुळे गणपतीपुळेसह जिल्ह्यातील किनारी भागामध्ये पर्यटकांचा राबता वाढला आहे. गणपती मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर पर्यटकांची पावले आपसूकच समुद्रस्नानाच्या ओढीने किनार्याकडे धाव घेतात. त्यांच्या सुरक्षेसाठी किनार्यावर जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे; मात्र गेले दोन दिवस वातावरण बदलामुळे लाटांचा वेग वाढला असून पाण्याला प्रचंड करंट आहे. गुरुवारी सकाळी बेळगाव येथून आलेल्या पर्यटकांच्या एका कुटूंबातील दोन तरुण पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते. ते मंदिरापासून शंभर मीटर अंतरावरील परिसरात पोहण्याचा आनंद घेत होते. पोहताना लाटांबरोबर ते खोल समुद्राकडे जाऊ लागले. पाणी वेगाने किनार्यावर येऊन आतमध्ये जात असल्याने अनेक पर्यटक सुरक्षित ठिकाणी पोहत होते. बेळगावमधील ते दोघे पर्यटक लाटांबरोबर खोल समुद्राकडे जाऊ लागले. ही बाब किनार्यावरील जीवरक्षक अक्षय माने, अनिकेत चव्हाण, विक्रम राजवाडकर, आशिष मोने हे सतर्क झाले. दुर्घटना टाळण्यासाठी ते समुद्राच्या दिशेने धावले; मात्र त्याचवेळी किनार्यावर असलेल्या मोरया स्पोर्टस्च्या एका जेट स्की चालकाने प्रसंगावधान राखत त्या दोघांना सुरक्षितरित्या पुन्हा किनार्याकडे आणले. वेळीच त्या दोघांना बाहेर काढल्यामुळे पुढील प्रसंग टळला. यंदाच्या हंगामात गणपतीपुळे किनार्यावर पर्यटक बुडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सागरी क्रीडा प्रकार चालू केल्यानंतर गणपतीपुळेत समुद्रात पर्यटकांना संरक्षण मिळत असून बुडण्याचे प्रकारही झाले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये गणपतीपुळेत चाळीस जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायत, देवस्थान, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि पोलिस प्रशासनाकडून जीवरक्षक नेमण्यात आले आहेत.