रत्नागिरी:- कोरोनाचे निर्बंध उठवल्यानंतर आता पर्यटनाला चालना मिळू लागली आहे. पर्यटनातून रोजगाराला चालना मिळण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने कोकण विभागातील पर्यटन विकासासाठी 5 हजार 313 लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील सागरेश्वर, तारकर्ली, मिठबाव, विजयदुर्ग समुद्रकिनाऱयावर उपाहारगृह, रेस्क्यू बोट येणार आहेत तर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गणपतीपुळे येथील एमटीडीसीच्या बोट क्लबसाठी देशातील पहिली अतिवेगवान पॅसेंजर जेट बोट खरेदीसाठी 3 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
राज्य सरकारने पर्यटन विकासासाठी मागील दोन वर्षांत विविध धोरणे जाहीर केली आणि मोठय़ा प्रमाणावर निधीही मंजूर केला आहे. कोकण विभागातील पर्यटन विकासासाठी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेतला आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन’ या प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत कोकण विभागाचा विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत सिंधुदुर्ग जिह्यातील प्रमुख समुद्रकिनाऱयांवर उपाहारगृहासोबतच स्वच्छतागृह, निरीक्षण मनोरे, रस्ते आणि समुद्रात पोहायला उतरणाऱया पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी रेस्क्यू बोटीची सुविधा देण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिह्यासोबतच मुंबई, ठाणे व आसपासच्या भागातही ग्रामीण पर्यटन विकास योजनेअंतर्गत समुद्रकिनाऱयांचा विकास करण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून आक्सा, मार्वे, मढ, गोराई समुद्रकिनारा व वांद्रे येथील पर्यटन विकासाच्या कामांसाठी 2 हजार 191 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. त्याशिवाय पालघर जिह्यातील केळवे, माहीम, शिरगाव, नांदगाव, बोर्डी, अर्नाळा समुद्रकिनाऱयांवर पर्यटकांसाठी बायोटॉयलेट, कपडे बदलण्याच्या खोल्या (चेंजिंग रूम), समुद्रकिनाऱयावर पर्यटकांना निवांत बसण्याची सुविधा दिली जाणार आहे.
जेट बोटीसाठी 3 कोटी
सिंधुदुर्ग जिह्यापाठोपाठ गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिह्यातील पर्यटकांची संख्या वाढत आहे. समुद्र पर्यटनाला धार्मिक पर्यटनाची जोड देण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गणपतीपुळे येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या बोट क्लबसाठी हिंदुस्थानातील पहिली अतिवेगवान पॅसेंजर जेट बोट खरेदी करण्यासाठी 3 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे.