गटारीच्या मुहूर्तावर मच्छीमारांच्या जाळ्यात बोटभर बांगडा 

रत्नागिरी:- हंगामाच्या सुरवातीलाचा वादळसंदृश्य परिस्थितीने मच्छीमारांची निराशा केली; मात्र वातावरण स्थिरावल्यामुळे दोन दिवसात गिलेनटधारक मच्छीमारांना होडी भर बंपर बांगडा मिळू लागला आहे. मिरकरवाडा बंदरातील दोन-चार जणांना रविवारी बांगडा जाळ्यात सापडल्याने चांगलीच गटारी साजरी झाली. किलोला दीडशे ते दोनशे रुपये दर मिळाल्याची चर्चा सुरु आहे.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ढगफुटीसारख्या पावसाने भागात अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुढे आठवडाभर वातावरण बिघडलेले होते. 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरु झाली, तरी समुद्र खवळलेला असल्याने अनेकांना इच्छा असूनही मासेमारीला जात येत नव्हते. शनिवारपासून वातावरण स्थिरावू लागले आहे. वादळानंतरची ही स्थिती मच्छीमारांच्या पथ्थ्यावर पडू लागली आहे. रविवारी सकाळी मिरकरवाडा बंदरात दोन-चार पारंपारीक नौकांना बंपर बांगडा लागला होता. अल्लाउद्दीन अब्दुला मजगावकर यांना होडी भरुन मासे मिळाले होते. पारंपारिक मच्छिमारांसाळी हा मासा बंपर ठरला आहे. धोका पत्करुन जाणार्‍यांना गेले काही दिवस शंभर किलोपर्यंत बांगडा मिळत होता. वारे कमी झाल्यामुळे खोल समुद्रात गेलेली मासळी किनार्‍यावर येऊ लागलेली आहे. बांगडयाचा दर 150 ते 200 रुपये मिळत होता. मोठ्या प्रमाणात मासे मिळू लागल्यामुळे खवय्यांची चंगळ झाली होती. गणपतीपुळे ते मिर्‍या या परिसरात बांगडा मिळत आहे. कासारवेलीतील एखाद-दुसर्‍या दोन ते चार जाळी मासा मिळाला आहे. एक जाळी बत्तीस किलो मासळी मिळाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बांगडा चांगला मिळत असल्याचे मच्छीमारांचे मत आहे. ही परिस्थिती अशीच रहावी अशी अपेक्षा मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे.