खैर तस्करीची माहिती दिल्याच्या संशयातून मारहाण

चिपळूण:- खैराच्या चोरट्या धंद्याची वनविभागाला माहिती देत असल्याच्या संशयावरून तरुणाला तिघांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. ही घटना ५ रोजी रात्री ९.३० वाजता निसर्ग हॉटेलच्या बाहेर पेढांबे फाट्याजवळ घडली. ही मारहाण करतेवळी हातातील कड्याचा वापर करण्यात आला असून याप्रकरणी तिघांवर रविवारी अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तावडे, गजानन खरात उर्फ बुवा (पूर्ण नाव माहीत नाही), प्रवीण जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद समीर बबन गायकवाड (३९, चिपळूण) यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन खरात याचा भाऊ बाळा व त्याचे मित्र साबळे या दोघांच्या खैर लाकडाचा चोरट्या धंद्याची वन विभागाला माहिती व पत्र देतो असा संशय तावडे याने समीर गायकवाडवर घेतला. या रागातून त्याने त्याच्या हातातील स्टीलचे जाड कडं काढून ते हातामध्ये गच्च पकडून समीरला मारहाण केली. यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली. यावेळी तो खाली पडला असता तावडे, गजानन खरात, प्रवीण जाधव यांनी लाथा-बुक्कांनी मारहाण- शिवीगाळ करत धमकी दिली. याप्रकरणी त्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.