खेड:- भरणे येथे रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात, मुंबई-गोवा महामार्गावर गोव्याच्या दिशेकडे जाणारे वाहन बुधवारी रात्री ९.१० वाजण्याच्या सुमारास खेड पोलिसांनी थांबवले असता त्यातून लाखो रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.
ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. खेड पोलिस ठाण्यातील तपास पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे, पोलिस शिपाई अजय कडू, संकेत गुरव, साजिद नदाफ, किरण चव्हाण, चालक रूपेश पेढामकर यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. २ रोजी सापळा रचून गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या रियाज हशम तांबोळी (६५, रा. घर नं. ३३९, कोळीआळी, महाबळेश्वर, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) याला भरणेनाका परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख २६ हजार रुपये किंमतीचा ८ किलो ४१० ग्रॅमचा गांजा पोलिसानी हस्तगत केला. या कारवाईत अमली पदार्थ, चारचाकी वाहन, मोबाईल फोन असा एकूण ४ लाख ७८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस शिपाई अजय कडू यांनी या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलिस ठाण्यात अमली औषधी द्रव्य वमन प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ (एन.डी. पी. एस. कायदा) कलम ८ (क). २० (ब) (२), २२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी रियाज हशम तांबोळी (६५ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशिद, पोलिस निरीक्षिक श्रीमती निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी केली.